नेरळ-खांडा मार्गावरील खड्डे स्वखर्चाने भरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 00:07 IST2019-07-16T00:07:15+5:302019-07-16T00:07:25+5:30
नेरळ-खांडा या भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण अपूर्ण असल्याने चालकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

नेरळ-खांडा मार्गावरील खड्डे स्वखर्चाने भरले
नेरळ : नेरळ-खांडा या भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण अपूर्ण असल्याने चालकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र हे काम पूर्ण करण्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर येथील ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे भरले आहेत. यामुळे नाईक यांचे परिसरात कौतुक होत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुमारे २२.५० कोटी एवढा निधी नेरळला दिल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली. रस्त्यासाठीचा निधी एमएमआरडीएने जिल्हा परिषद रायगडकडे वर्ग करून या कामाची जबाबदारी जिल्हा परिषदेने घेतली. रस्त्याच्या कामांना सुरवात झाल्यावर आता नेरळमधील रस्ते चकाचक होणार या आशेने नेरळकर सुखावले होते मात्र नेरळ रेल्वे स्टेशन ते खांडा रस्त्याचे काम रेंगाळले. ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवून दुसºया ठिकाणच्या कामाला सुरुवात केली. अपूर्ण कामामुळे चालक तसेच नागरिकांना अडचणी येत होत्या. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा अपघातही झाले आहेत.
याबाबत ग्रामस्थांमधून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला, मात्र खड्डे बुजवण्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे व्यथित होऊन येथील ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी स्वत:कडील १००० खर्च करून रस्त्यावरील खड्डे बुजवले.