पोलीस, तटरक्षक दल मूळ स्रोत शोधण्यात अपयशी
By Admin | Updated: August 6, 2015 03:00 IST2015-08-06T03:00:43+5:302015-08-06T03:00:43+5:30
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी सापडलेले काळ्या तेलाचे पिंप नेमके कुठून व कसे आले, हे शोधण्यात पोलीस व तटरक्षक दलाला यश आले नाही.

पोलीस, तटरक्षक दल मूळ स्रोत शोधण्यात अपयशी
जयंत धुळप , अलिबाग
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी सापडलेले काळ्या तेलाचे पिंप नेमके कुठून व कसे आले, हे शोधण्यात पोलीस व तटरक्षक दलाला यश आले नाही.
मोठ्या मालवाहू बोटीवरील शिप लॅशिंग (दोरखंडाची जाळी) तुटून काळ््या तेलाची पिंपे समुद्रात पडण्याची शक्यता अधिक असल्याचे वक्तव्य कोकणातील रत्नागिरी येथील मरिनर आणि मरिन सिंडिकेट प्रा.लि. या बोट निर्मिती उद्योगाचे संस्थापक, संचालक दिलीप भाटकर यांनी केले. रायगडच्या किनारपट्टीत आतापर्यंत निष्पन्न झालेल्या काळ््या तेलाच्या ४५ पिंपांच्या पार्श्वभूमीवर भाटकर बोलत होते. मोठ्या बंदरात एखाद्या मोठ्या मालवाहू बोटीच्या इंजिनाच्या दुरुस्तीचे काम केल्यावर, त्या इंजिनातील वापरलेले आॅईल समुद्रात टाकण्यास पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये सक्त बंदी असल्याने हे वापरलेले काळे तेल त्याच बोटीवर असणाऱ्या ‘फ्लश टँक’मध्ये भरून ठेवले जाते. काही वेळेस हे फ्लश टँक भरले तर हे काळे तेल लोखंडी पिंपात भरून, ही पिंपे बोटीच्या मागील बाजूस डेकवर ‘शिप लॅशिंग’ने (दोरखंडाची जाळी) बांधून ठेवली जातात. पूर्वी हे काळे तेल समुद्रात टाकल्याचे अनेकदा कोकण किनारपट्टीत दिसून आले आहे. आता काळ््या तेलाची ही पिंपेच टाकण्याची मानसिकताही दिसून आल्याचे भाटकर यांनी सांगितले.
गेल्या रविवारपासून रायगडच्या सागरी किनारपट्टीत काळ््या तेलाची बेवारस पिंपे वाहत येत आहेत, परंतु गेल्या तीन दिवसांत स्थानिक पोलीस आणि तटरक्षक दलास ही पिंपे नेमकी कोठून येत आहेत, त्यांचा मूळ स्रोत काय, हे शोधून काढण्यात यश आलेले नाही. या काळ््या तेलाच्या बेवारस पिंपांचा मूळ स्रोत भारतीय सागरी सीमेच्या बाहेर असल्याचा कयास रायगड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी व्यक्त केला आहे. रविवारपासून रेवदंडा, मुरुड, दिघी, मांडवा, अलिबाग व श्रीवर्धनच्या सागरीकिनाऱ्यांवर ४५ पिंपे व ५ कॅन निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.