पनवेल: ग्रामपंचायतीच्या गुरुवारी लागलेल्या निकालांमध्ये पनवेल तालुक्यातील १५ पैकी १० ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व सिध्द केले तर पाच ग्रामपंचायती भाजपाने जिंकण्यात यश मिळविले. मंगळवारी (४ आॅगस्ट) पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पनवेल तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले होते. त्यांच्या मतमोजणीची प्रक्रि या गुरु वारी सकाळी पनवेल तहसील कार्यालयात सुरु झाली. पाले खुर्द, आपटे, उसर्ली खुर्द, हरिग्राम, पाली देवद, तरघर या ग्रामपंचायतींवर निवडणुकांपूर्वी शेकापचे वर्चस्व होते. या सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींवर पुन्हा लाल बावटा फडकला. तसेच शेकापच्या अखत्यारीत नसलेली देवळोली ग्रामपंचायत सुद्धा या वेळी शेकापने जिंकली आहे.विशेष म्हणजे खानाव,वलप, खैरवाडी या भाजपाच्या ताब्यातील ग्रामपंचायती शेकापने जिंकल्या. तर भाजपाने आकु र्ली, पिसार्वे, वार्डोली, उमरोली, केवाळे या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या. निवडून आलेल्या उमेदवारांची आपापल्या विभागात वाजतगाजत मिरवणुका काढण्यात आल्या. (वार्ताहर)काळेश्री ग्रामपंचायतीवर शेकापचा झेंडापेण : विभाजन झालेल्या बोर्झे ग्रामपंचायतीच्या निर्माण झालेल्या काळेश्री व बोर्झे ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालात काळेश्री ग्रामपंचायतीवर शेकाप तर बोर्झे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीने बाजी मारली. मूळच्या बोर्झे ग्रामपंचायतीच्या विभाजनानंतर पहिल्या स्वतंत्र निवडणूक निकालाची उत्सुकता होती. काळेश्रीमध्ये कामगार नेते डी.एम. म्हात्रे यांचे वर्चस्व कायम राहिले. विरोधी पक्ष एकजुटीने लढून सुद्धा काळेश्रीवर शेकापचे वर्चस्व रोखण्यात म्हात्रे, जगदीश ठाकूर, जगदीश पाटील, बबन म्हात्रे या चौकडीला यश आले. काळेश्रीमध्ये शेकापचे विजयी उमेदवार नरदास पाटील, शोभा पाटील, अस्मिता ठाकूर, महेश ठाकूर, रुपालिनी शाम म्हात्रे हे पाच उमेदवार आहेत तर विरोधी गटात सुमित ठाकूर व रंजना म्हात्रे यांचा समावेश आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने विजय मिळाल्याचे डी.एम. म्हात्रे म्हणाले.बोर्झे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास आघाडीचा विजय झाला असून महेंद्र ठाकूर, वृषाली ठाकूर, मिलिंद पाटील, कविता ठाकूर हे बोर्झे गावचे चार उमेदवार व जनवली बेर्डी येथील अविनाश भोईर अशा पाच जागांवर ग्रामविकास आघाडीने बाजी मारली आहे.
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शेकाप
By admin | Updated: August 6, 2015 23:31 IST