‘आॅपरेशन मुस्कान’मुळे पालकांचे चेहरे खुलले
By Admin | Updated: August 4, 2015 03:09 IST2015-08-04T03:09:44+5:302015-08-04T03:09:44+5:30
पोलिसांनी राबवलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे हरवलेल्या ४६ मुलांचा शोध लागला आहे. शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण जुलै महिन्यात पोलिसांनी ही

‘आॅपरेशन मुस्कान’मुळे पालकांचे चेहरे खुलले
नवी मुंबई : पोलिसांनी राबवलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे हरवलेल्या ४६ मुलांचा शोध लागला आहे. शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण जुलै महिन्यात पोलिसांनी ही मोहीम राबवली होती. सुमारे पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या काही मुलांचाही यादरम्यान शोध लागला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार १ ते ३१ जुलै दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी ‘आॅपरेशन मुस्कान’ राबवले. या मोहिमेअंतर्गत शहरातून हरवलेल्या मुलांचा अथवा सापडलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात आला. त्याकरिता आश्रयगृह, रेल्वे स्थानके, बस स्थानके आदी ठिकाणची अनाथ मुले, तसेच कचरावेचक व भीक मागणाऱ्या मुलांची माहिती एकत्रित केली. शासनाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण माहिती संकेतस्थळावर भरली जात होती. त्यानुसार हरवलेल्या तब्बल ४६ मुलांचा शोध लागल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. आयुक्त प्रभात रंजन, अप्पर आयुक्त विजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी शोधलेल्या मुलांमध्ये २८ मुली तर १८ मुले आहेत. त्यांना राज्यात तसेच राज्याबाहेरच्या विविध ठिकाणांवरून ताब्यात घेवून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याशिवाय इतर ८ अल्पवयीन मुले संशयित व्यक्तींकडे आढळून आली आहेत. त्यांना बालसुधारगृहात ठेवून संबंधितांचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहे. या मोहिमेदरम्यान बहुतांश मुले कौटुंबिक कारणामुळे घरातून पळाल्याचेही समोर आले आहे. अंकुश सिंग हा ८ वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल होती. कौटुंबिक परिस्थिती बऱ्यापैकी असतानाही आई भीक मागायला पाठवायची. जर नाही गेला तर मारायची. मात्र भीक मागण्याऐवजी शाळेत जा असे सांगणारे वडीलही शाळेत नाही गेला तर मारायचे. त्यामुळे द्विधा मन:स्थिती झालेला अंकुश एक वर्षापूर्वी घर सोडून पळून गेला. पनवेल रेल्वे स्थानकात भीक मागताना तो अजाणतेपणे एक्स्प्रेस रेल्वेत चढल्याने तो थेट कर्नाटकात पोचला होता.