पनवेल पालिका निवडणूक: भाजपसोबत युती न झाल्यास शिंदेसेनेला मैदान जाणार अवघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:21 IST2025-12-16T12:19:47+5:302025-12-16T12:21:21+5:30
शिंदेसेनेचे अस्तित्व पूर्णपणे भाजपवर अवलंबून असल्याने युती न झाल्यास त्यांना ही निवडणूक अवघड जाणार आहे.

पनवेल पालिका निवडणूक: भाजपसोबत युती न झाल्यास शिंदेसेनेला मैदान जाणार अवघड
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिकेची स्थापना मुळात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने झाली. पहिल्याच २०१६ सालच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळून पक्षाची एकहाती सत्ता आली. नंतरच्या काळात शेकापच्या जवळपास १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१६ मध्ये पालिकेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत एकसंघ शिवसेना स्वबळावर लढली होती. यावेळी एकही जागा शिवसेनेला मिळवता आली नाही.
२०१६ निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. तत्कालीन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे स्वताः निवडून आले होते. त्यांनी शरद पवार गटात थांबण्याचा निर्णय घेतला, तर दुसरे नगरसेवक विजय खानावकर हे तटस्थ असून, अद्याप त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
पनवेल २०१६ चे पक्षीय बलाबल ७८ नगरसेवक
भाजप - ५१
शेकाप - २३
काँग्रेस - २
राष्ट्रवादी - २
सध्या काय शक्यता ? : भाजप व शिंदेसेनेची युतीची शक्यता धूसर आहे. दोन्ही शिवसेना एकत्र असताना पनवेलमधून एकही जागा त्यांना जिंकता आलेली नव्हती. त्यामुळे स्थानिक भाजप नेतृत्व शिंदेसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही दिसत नाही. शिंदेसेनेचे अस्तित्व पूर्णपणे भाजपवर अवलंबून असल्याने युती न झाल्यास त्यांना ही निवडणूक अवघड जाणार आहे.