पनवेल बसस्थानक समस्यांचे आगार, प्रवाशांना त्रास; स्वच्छतेचा बोजवारा उडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:15 IST2020-08-26T00:15:48+5:302020-08-26T00:15:55+5:30
लॉकडाऊन संपल्यानंतर बसस्थानकातून काही प्रमाणात एसटी बसेस पुन्हा कार्यरत झाल्या आहेत. तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.

पनवेल बसस्थानक समस्यांचे आगार, प्रवाशांना त्रास; स्वच्छतेचा बोजवारा उडाला
कळंबोली : गेल्या गुरुवारपासून लाल परी धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, पनवेल प्रवाशांची गर्दी बसस्थानकात वाढण्यास सुरुवात झाली आहे. बसस्थानक आवारात मोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याकडे आगार प्रमुखाने लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर बसस्थानकातून काही प्रमाणात एसटी बसेस पुन्हा कार्यरत झाल्या आहेत. तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या चार दिवसांतच प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पनवेल शहराला बसला, त्यात पनवेल बसस्थानकातील झाड उन्मळून पडले आहे. ते अद्याप उचलले नसल्याने पाने कुजून दुर्गंधी सुटली आहे. मोबाइल टॉयलेट जागेपासून दोन फुटांवर आडवे झाले आहे. ते अद्याप उचलले नाही. त्याचबरोबर, स्थानक आवारात मोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. खड्ड्यात बस आदळल्याने बसचेही मोठे नुकसान होत असल्याचे बसवाहक खासगीत सांगतात. या समस्यांकडे आगाराच्या प्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.