रायगडमध्ये आतापर्यंत केवळ एकादच बनली महिला खासदार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 04:08 IST2019-03-20T04:08:38+5:302019-03-20T04:08:55+5:30
१९९९ मध्ये काँग्रेसने पुष्पा साबळे यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघातून महिला खासदार निवडून आणून दिल्लीत पाठवले.

रायगडमध्ये आतापर्यंत केवळ एकादच बनली महिला खासदार!
अलिबाग - पुरोगामी विचारांची दिग्गज नेतृत्वे पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड लोकसभा मतदार संघात असताना १९५२ ते २०१४ या एकूण १७ लोकसभा निवडणुकीत, १९९९ मध्ये काँग्रेसने पुष्पा साबळे यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघातून महिला खासदार निवडून आणून दिल्लीत पाठवले. हा एक प्रयत्न वगळता उर्वरित १७ लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने महिलेस उमेदवारी दिलेली नाही.
२०१९ च्या १८ व्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदार ८ लाख ३ हजार ७२ आहेत तर महिला मतदार तब्बल ३१ हजार ६९४ ने अधिक म्हणजे ८ लाख ३४ हजार ७६६ आहेत. काँग्रेसने १९९९च्या लोकसभा निवडणुकीत पुष्पा तुकाराम साबळे यांना उमेदवारी देऊन आम्ही प्रथम महिला उमेदवारास संधी दिली, असा दावा त्या वेळी केला असला तरी या उमेदवारीमागील राजकीय गणित फार निराळे होते, हे काँग्रेसजन आता मोकळेपणाने सांगतात. शेकापचे तत्कालीन खासदार रामशेठ ठाकूर हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात होते. तर त्यांच्या समोर १९७७ आणि १९८४ अशा दोन वेळेस शेकापमधून खासदार झालेले; परंतु या वेळी शेकापला रामराम ठोकून शिवसेना उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते.
अटीतटीच्या या निवडणुकीत शेकापचे रामशेठ ठाकूर यांना सर्वाधिक २ लाख ७४ हजार ३६१ मते मिळाली आणि ते ४३ हजार ९७ मताधिक्याने विजयी होऊन दुसऱ्यांदा खासदार झाले होते. शिवसेनेचे दि.बा. पाटील यांना २ लाख ३१ हजार २६४ मते मिळाली. लोकसभा मतदार संघात नवख्या महिला उमेदवार पुष्पा साबळे १ लाख ४८ हजार १४६ मते मिळाली.