२८ धरणांत ३१ टक्केच पाणी
By Admin | Updated: April 29, 2017 01:51 IST2017-04-29T01:51:14+5:302017-04-29T01:51:14+5:30
रायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून

२८ धरणांत ३१ टक्केच पाणी
जयंत धुळप / अलिबाग
रायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून शुक्रवारी उपलब्ध माहितीनुसार या २८ धरणांमध्ये केवळ ३१ टक्के म्हणजे २१.१७ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. येत्या ५ जून रोजी ऋतूचक्रानुसार मान्सून पावसाचे आगमन झाले तर संपूर्ण मे महिन्यात जिल्हावासीयांची तहान भागविण्यात हा शिल्लक जलसाठा असमर्थ ठरणार असल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जिल्ह्यातील या २८ धरणांपैकी पेण तालुक्यातील आंबेघर धरणात केवळ दोन टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर खालापूर तालुक्यातील भिलवले धरणात १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ११ ते २० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ५ धरणे, २१ ते ३० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे,३१ ते ४० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे, ४१ ते ५० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३ धरणे,५१ ते ६० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३धरणे, तर ६१ ते ७० टक्के जलसाठा शिल्लक असलेले पाभरे(म्हसळा) हे एक धरण जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ सद्यस्थितीत २० टॅँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी येत्या मे महिन्यात अधिक तीव्र होणाऱ्या उन्हाळ््यात टँकर्सची संख्या दुपटीपेक्षा अधिक करावी लागेल, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, टँकरकरिता पाणी नेमके कुठून उपलब्ध करायचे असाही एक सुप्त प्रश्न आहे.
राष्ट्रीय जलनितीनुसार पिण्याच्या पाण्यास प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर शेती व औद्योगिकीकरणास पाणी असा क्रम असल्याने, औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील औद्योगिक कारखाने व्यवस्थापनांच्या पोटातदेखील यंदा या पाणीटंचाईमुळे गोळा आला आहे. पिण्याकरिता पाणी अपुरे पडू लागले, तर औद्योगिक कारखान्यांच्या पाण्यात कपात करण्याचे सूत्र स्वीकारले जाते, त्याचा परिणाम औद्योगिक कारखाने बंद करणे वा त्यांचे उत्पादन कमी करणे असा होत असल्याने औद्योगिक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.