कर्जत तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण घटले

By Admin | Updated: April 23, 2017 03:55 IST2017-04-23T03:55:22+5:302017-04-23T03:55:22+5:30

आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेला कर्जत तालुका २०१६ मध्ये सरकारी पातळीवर कुपोषणामुळे चर्चेत आला. आॅगस्ट २०१६ मध्ये येथील कुपोषणाने द्विशतक गाठले

The number of malnutrition declined in Karjat taluka | कर्जत तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण घटले

कर्जत तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण घटले

- संजय गायकवाड,  कर्जत
आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेला कर्जत तालुका २०१६ मध्ये सरकारी पातळीवर कुपोषणामुळे चर्चेत आला. आॅगस्ट २०१६ मध्ये येथील कुपोषणाने द्विशतक गाठले होते. आठ महिने जिल्हास्तरावरून अंगणवाडीपर्यंत सर्व पातळीवर प्रयत्न झाल्याने आता कर्जत तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. आता १२ अतितीव्र आणि ६६ तीव्र कुपोषित बालके निरीक्षणाखाली आहेत. महिला बालविकास आणि आरोग्य विभागाबरोबर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने तालुक्यातील कुपोषण १०० ने खाली आले आहे.
गतवर्षी रेल्वे मार्गाच्या आसपास असलेल्या गावात तालुक्यातील निम्मे कुपोषणग्रस्त बालके आढळल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली होती. आॅगस्ट २०१६ मध्ये कर्जत तालुक्यात अतितीव्र कुपोषित ४५ आणि तीव्र कुपोषित १३६ अशी १८९ बालके आढळून आल्याने महिला बालविकास विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
तालुक्यातील दोन विभागात ३३५ अंगणवाड्या असताना तेथे कायमस्वरूपी नियुक्त केलेले प्रकल्प अधिकारी हे पद तीन वर्षांपासून रिक्त होते. कळंब, नेरळ, खांडस या विभागाचा मिळून एक आणि मोहिली, कडाव, आंबिवली या विभागांचा दुसरा प्रकल्प कर्जत तालुक्यात राबविण्यात आला आहेत. दर दोन महिन्यांनी आरोग्य विभाग आणि महिला बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यातील कुपोषित बालकांची पाहणी करून त्यांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे काम समन्वयातून केले जाते. मात्र तालुक्यात १८९ कुपोषित बालके आढळल्याने केंद्र सरकारची डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना तालुक्यातील ४७ अंगणवाड्यात सुरू करण्यात आली. त्यानंतरही कुपोषण कमी होत नसल्याने जिल्ह्यात बंद असलेले राज्य सरकारचे अनुदान सुरू करण्यात आले.
जिल्ह्यासाठी ७५ लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या निधीमधून कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी आॅक्टोबर २०१६ मध्ये अंगणवाड्यात ग्राम बालसुधार केंद्र सुरू करण्यात आली. गाव पातळीवर कुपोषित बालकांवर अधिक पोषण आहाराचा प्रयत्न करूनदेखील कुपोषण कमी होण्याचे नाव घेत नव्हते. काही सामाजिक आणि स्वयंसेवी संघटना पुढे येऊन देखील कुपोषण कमी होत नसल्याने अखेर कर्जत तालुक्यातील सर्व कुपोषित बालकांची बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. त्यातून निघालेल्या निष्कर्षातून कर्जत तालुक्यात उपजिल्हा रु ग्णालय आणि कशेळे ग्रामीण रु ग्णालय येथे कुपोषित बालकांना दाखल करून उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नोव्हेंबर २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अति आणि तीव्र कुपोषित बालकांना दाखल करून २१ दिवसांचे निवासी शिबिर सुरू करण्यात आले. डिसेंबर महिन्यात कर्जतबरोबरच कशेळे ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू करून कुपोषित बालकांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू केले गेले. त्या बालकांबरोबर त्यांच्या पालकांना निवासी ठेवण्यात आले, शिवाय त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली.
आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे कर्जत तालुक्यातील कुपोषण निम्म्याहून अधिक कमी झाले आहे.

- कर्जत तालुक्यातील दोन्ही प्रकल्पांत मिळून १२ अतितीव्र कुपोषित बालके असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या दोन्ही ठिकाणी मिळून ६६ इतकी आहे. तालुक्यात गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे तब्बल १०० बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत.

सामूहिक प्रयत्न केल्याने कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी झाले आहे. तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी सरकारी योजनांबरोबरच सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- सुरेश लाड, आमदार

Web Title: The number of malnutrition declined in Karjat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.