नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:19 IST2025-11-07T07:18:13+5:302025-11-07T07:19:06+5:30
पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणासाठी मिनी ट्रेन होती बंद

नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
कांता हाबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नेरळ: पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणासाठी बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन गुरुवारपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या सेवेचा शुभारंभ नेरळ स्थानकात मोठ्या उत्साहात करण्यात आला. नेरळ जंक्शन स्थानकातून १९०७मध्ये ही मिनी ट्रेन सुरू झाली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने दरवर्षी १५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत या मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाते. यावर्षी मे महिन्यात पाऊस आला.
आणि १५ जून रोजी बंद होणारी मिनी ट्रेन २६ मेपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर मोसमी पाऊस लांबला आणि १५ ऑक्टोबर रोजी ही मिनी ट्रेन पुन्हा आपला प्रवास सुरू करू शकली नव्हती. परंतु, प्रचंड मागणी असल्याने मिनी ट्रेनच्या मार्गावर मालवाहू गाड्यांची चाचणी घेण्यात आली.
त्या चाचणीमध्ये २८ ऑक्टोबर रोजी नेरळ येथून निघालेली मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा मालवाहू गाडी २ नोव्हेंबरला पाठवण्यात आली आणि या मालवाहू गाडीचा प्रवास सुखरूप झाल्यानंतर नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनची प्रवास सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केला होता. त्यानंतर ही मिनी ट्रेन गुरुवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली.
शटल सेवा पूर्वीसारखी सुरू
तब्बल २० दिवस उशिरा मिनी ट्रेन सुरू झाली असून याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात नेरळ येथून सकाळी मालवाहू गाडी सोडली जाणार आहे. त्यानंतर ९ वाजता पहिली तर साडेदहा वाजता दुसरी प्रवासी गाडी नेरळ येथून माथेरानसाठी सोडली जाणार आहे. तर माथेरान येथून नेरळसाठी पहिली गाडी पावणे दोन वाजता आणि दुसरी गाडी ४ वाजता खाना होणार आहे. माथेरान ते अमन लॉज दरम्यान शटल सेवा पूर्वीसारखी सुरू राहणार आहे. यात शटल सेवेच्या दररोज सहा फेऱ्या होणार असून शनिवार, रविवार आठ फेऱ्या असणार आहेत.
असे आहे वेळापत्रक
माथेरानसाठी सकाळी ०८:५०, सकाळी १०:२५
नेरळसाठी दुपारी ०२:४५, दुपारी ०४:००