एनडीआरएफचा तळ महाडमध्ये कायम राहणार - माणिक जगताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:51 IST2020-08-31T00:51:13+5:302020-08-31T00:51:56+5:30
दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करायचे झाल्यास, त्यांना पोहोचण्यास विलंब लागतो. ही बाब लक्षात घेता, एनडीआरएफचा तळ महाडमध्ये तैनात असावा

एनडीआरएफचा तळ महाडमध्ये कायम राहणार - माणिक जगताप
महाड : महाड पोलादपूर तालुक्याला नैसर्गिक आपत्तींचा असलेला कायमस्वरूपी धोका लक्षात घेऊन, एनडीआरएफचा तळ महाडमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रायगड जिल्हा काँग्रेसचेच अध्यक्ष तथा माजी आमदार माणिक जगताप यांनी मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल शासनाने घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
महाड पोलादपूर या दोन्ही तालुक्यांना नैसर्गिक आपत्तींचा कायमस्वरूपी धोका आहे. या तालुक्यातील अनेक गावे दरडप्रवण म्हणून शासनाने निश्चित केलेली आहेत. दरडींची आणि महापुराची टांगती तलवार महाड शहर आणि या तालुक्यांना कायम आहे. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करायचे झाल्यास, त्यांना पोहोचण्यास विलंब लागतो. ही बाब लक्षात घेता, एनडीआरएफचा तळ महाडमध्ये तैनात असावा, अशी मागणी जगताप यांनी २६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या निवेदनात केली होती.