मत्स्यशेतीतून पर्यटनाला चालना; खारेपाटात टाशीवरील रस्त्यांकरिता सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:58 IST2019-02-09T23:57:58+5:302019-02-09T23:58:24+5:30
खारेपाटातील ‘टाशी’ अर्थात दोन शेतांमधील रस्तासदृश बांधाचे रूपांतर शासनाच्या ‘पाणंद रस्ते’ (शेतरस्ते) योजनेतून रस्त्यांमध्ये केल्यास पर्यटक मत्स्य तलावांपर्यंत पोहोचतील, तसेच तलावातील मासे बाजारपेठेत अल्पावधीत पोहोचतील.

मत्स्यशेतीतून पर्यटनाला चालना; खारेपाटात टाशीवरील रस्त्यांकरिता सर्वेक्षण सुरू
- जयंत धुळप
अलिबाग : खारेपाटातील ‘टाशी’ अर्थात दोन शेतांमधील रस्तासदृश बांधाचे रूपांतर शासनाच्या ‘पाणंद रस्ते’ (शेतरस्ते) योजनेतून रस्त्यांमध्ये केल्यास पर्यटक मत्स्य तलावांपर्यंत पोहोचतील, तसेच तलावातील मासे बाजारपेठेत अल्पावधीत पोहोचतील. त्यामुळे परिसरात समृद्धी येऊ शकते, असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खारेपाटातील शेतकरी शिष्टमंडळाबरोबरच्या चर्चेत व्यक्त केला.
खारेपाटातील शहापूर-धेरंड गावातील पारंपरिक तलावात जिताडा मत्स्यशेती हा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहे. ही मत्स्यशेती पर्यटन व्यवसायाशी जोडली, तर ‘जिताडा व्हिलेज’ ही आधुनिक आणि स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार देणारी अनोखी संकल्पना ठरेल. त्यासाठी जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना चर्चेकरिता निमंत्रित केले होते. श्रमिक मुक्ती दलाचे समन्वयक ए.जी. पाटील, तामिळनाडूमधील केंद्र सरकारच्या राजीव गांधी सेंटर फॉर अॅक्वाकल्चर या संस्थेतून खेकडा संवर्धन विषयक प्रशिक्षण घेऊन आलेले किरण पाटील, सुधीर पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी उपस्थित होते.
जिताडा माशांबरोबरच कांदळवन क्षेत्रात खेकडा संवर्धनाकरिता अत्यंत पोषक परिस्थिती आहे. त्यातून कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल. खेकड्याला देशाबरोबरच परदेशात मोठी मागणी असून, त्यांतून परकीय चलन उपलब्ध होऊ शकते. तामिळनाडूमधील खेकडा संवर्धन आणि विक्री व्यवसाय देशात अव्वल आहे. संपूर्ण कोकणात खेकडा संवर्धनातून आमूलाग्र आर्थिक क्रांती होऊन शेतकरी सधन होऊ शकतो, अशी भूमिका या वेळी किरण पाटील यांनी मांडली. त्यास अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन खारेपाटाकरिता खेकडा संवर्धन व विक्री प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर मोत्याच्या शिंपल्यांचे देखील संवर्धन होऊ शकते, त्या बाबतच्या शक्यता तपासण्याच्या सूचना सूर्यवंशी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी खारेपाटातील शेतकºयांना चर्चेकरिता आमंत्रित केले. जिताडा व्हिलेज सारख्या संकल्पनेला पर्यटनाची जोड देऊन, शेतकºयांच्या व्यवसायवृद्धीसाठी सुचवलेल्या पर्यायांमुळे शेतकºयांचा उत्साह वृद्धिंगत झाल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे. व्यवसायवृद्धीसाठी खारेपाटात टाशीवरील रस्त्यांकरिता शेतकरी सुधीर पाटील यांनी शहापूर-धेरंड गावांच्या खारेपाटातील टाशींचे सर्वेक्षण सहकारी शेतकºयांच्या मदतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू केले आहे.
जलव्यवस्थापनाचा नवा प्रस्ताव : खारेपाटातील बांधावरचा भाजीपाला आणि तलावातील मत्स्यशेती कायमस्वरूपी होण्यासाठी शाश्वत जलव्यवस्थापनाचा नवा प्रस्ताव शेतकºयांशी चर्चा करून श्रमिक मुक्ती दल तयार करीत आहे. हा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना सादर करण्यात येणार असल्याचे भगत यांनी सांगितले.