माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस, बळीराजा सुखावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 02:11 AM2019-06-12T02:11:17+5:302019-06-12T02:12:29+5:30

अनेक ठिकाणी वीज गायब : अलिबाग, कर्जत, पनवेल, पेणमध्ये सरी

Most rain in Matheran, the beggars dry | माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस, बळीराजा सुखावला

माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस, बळीराजा सुखावला

Next

अलिबाग : शनिवारी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला, तर सोमवारी संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वत्र उडणारी धूळ खाली बसली तर मातीचा सुखद सुगंध अनुभवास आला. मात्र या पावसात वीज वितरण कंपनी तग धरू शकली नाही. अलिबाग व पेण तालुक्यांसह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाऊस थांबल्यावर पुन्हा एकदा उकाडा सुरू झाला.

दरम्यान, मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद गिरिस्थान माथेरान येथे ४०.२० मिमी झाली. अलिबाग येथे ३५ मिमी, कर्जत येथे ३५.२० मिमी तर पनवेल येथे २७.५० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मुरुड येथे १६, पेण येथे १५.४०, खालापूर व रोहा येथे १२, माणगांव व उरण येथे ९, सुधागड येथे १०, पोलादपूर येथे ५, श्रीवर्धनमध्ये २ मिमी नोंद झाली आहे. तळा, महाड आणि म्हसळा येथे मात्र पावसाने गेल्या चोवीस तासात हजेरी लावलेली नाही.

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. मृग नक्षत्रावर आलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात काही तालुक्यांत शेतकऱ्यांनी भातासाठी पेरण्या सुरु केल्या आहेत. कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी पाच टक्के क्षेत्रावर पेरण्या पाऊस झालेल्या तालुक्यांत झाल्या आहेत.

रेवदंडा परिसरात वादळी पाऊस
१रेवदंडा : चौल-रेवदंडा परिसरात वादळी वाºयासह,विजांचा लखलखाट होऊन मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तास सरी कोसळत होत्या. पावसाला सुरुवात होताच बत्ती गुल झाली. गेले आठवडाभर उष्म्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना उकाड्यापासून थंडावा मिळाला आहे.
रसायनीत मेघगर्जनेसह पाऊस
२रसायनी : सोमवारी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत रसायनी परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला. मंगळवारी रसायनीचे तापमान ३३ अंश सेल्सिअस होते. हवामान ढगाळ होते व दुपारी ३.३० ते ४.०० वाजेपर्यंत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या.



बळीराजा सुखावला
३धाटाव : रोहा तालुक्यासह विविध भागांत रविवार ९ जून रोजी व १० जूनला रात्री ११.१५ वाजता पावसाचे वीज वाºयासह आगमन झाले. या मान्सूनपूर्व पावसाने प्रचंड प्रमाणात उष्णतेपासून नागरिकांना थोडा फार दिलासा मिळाला आहे. पावसात भिजण्याचा आनंद सर्वत्र नागरिकांनी घेतला व अनेक दिवसापासून होणारा उष्णतेचा दाह कमी झाला. हवामान खात्याकडून १२ तारखेपर्यंत पाऊस पडणार नाही असा अंदाज वर्तवला जात असला तरी गेली दोन दिवस ढगाळ वातावरणानंतर या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने सर्वत्र मातीचा सुगंध दरवळत होता. आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट बघणारा बळीराजा सुखावला आहे.

वेगवान वाºयासह वादळाची शक्यता
च्जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाºयासह जिल्ह्यात वादळी परिस्थिती निर्माण होवू शकते. जिल्ह्यात कोठेही कोणत्याही प्रकारची आपदजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक-०२१४१-२२२०९७ यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पावसाच्या माहितीसाठी स्कायमेट वेदर अ‍ॅप
च्कृषी विभागाने सार्वजनिक भागीदारीतून बांधा-मालक व्हा-चालवा(बीओटी) या तत्त्वावर ‘महावेध’ या प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूल मंडल स्तरावर ‘स्वयंचलित हवामान केंद्र’ (आॅटोमेटीक वेदर स्टेशन) स्थापन केले आहे.
च्या केंद्राद्वारे परिसरातील तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाºयाचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची प्रत्यक्ष चालू वेळेनुसार(रियल टाइम) माहिती दर १० मिनिटांनी नोंद केली जाते. जीपीएस लोकशनच्या आधारे संबंधित महसूल मंडळाची माहिती मोबाइल अ‍ॅपवर दिसेल.
च्ही माहिती ‘स्कायमेट वेदर अ‍ॅप’ या मोबाइल अपद्वारे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि संभाव्य पूर व दरडग्रस्त भागातील नागरिकांना या अ‍ॅपचा अधिक उपयोग होणार आहे.

किनारपट्टीलगतच्या गावांना १४ जूनपर्यंत सतर्कतेचा इशारा
अलिबाग : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या वादळाचा केंद्रबिंदू लक्षद्वीप बेटाच्या उत्तर पश्चिम दिशेस २०० किमी दूर आहे.
हे वादळ मुंबईपासून ८४० किमी दूर दक्षिण पश्चिम दिशेने व गुजरातच्या दक्षिण पूर्व दिशेला वेरावळ येथून १०२० किमी अंतरावर जाणार आहे. वादळ दूर समुद्रात असले तरी या काळात समुद्र खवळलेल्या अवस्थेत राहणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यात येत्या १४ तारखेपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे.
तसेच आगामी ७२ तासात हे वादळ उत्तर पश्चिम दिशेला वळणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. त्या अनुषंगानेही सतर्कता व खबरदारी बाळगण्याचा इशारा रायगड जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी संध्याकाळी देण्यात आला आहे. पावसामुळे नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
 

Web Title: Most rain in Matheran, the beggars dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.