‘मोरा-भाऊचा धक्का’ सागरी प्रवास २५ रुपयांनी महागणार, पावसाळी हंगामातील तिकीट दरवाढ जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:32 IST2025-05-21T15:32:09+5:302025-05-21T15:32:41+5:30
पावसाळी हंगामासाठी दरवाढ होणार असल्याने सागरी प्रवास ८० रुपयांवरून १०५ रुपयांपर्यंत जाणार आहे.

‘मोरा-भाऊचा धक्का’ सागरी प्रवास २५ रुपयांनी महागणार, पावसाळी हंगामातील तिकीट दरवाढ जाहीर
उरण : ‘मोरा-भाऊचा धक्का’ या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात २६ मेपासून पावसाळी हंगामासाठी २५ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. पावसाळी हंगामासाठी दरवाढ होणार असल्याने सागरी प्रवास ८० रुपयांवरून १०५ रुपयांपर्यंत जाणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा - भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात भरमसाट वाढ केली जाते. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दर ८० रुपयांंवरून थेट १०५ रुपयांपर्यंत वाढवले आहे. हाफ तिकीटही ३९ रुपयांवरून ५२.५० रुपयांपर्यंत म्हणजे १३.५० रुपये वाढविण्यात येणार आहे. ही तिकीट दरवाढ २६ मेपासून ३१ ऑगस्टपर्यंत लागू असणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली. दरवाढीची मंजुरी मेरिटाइम बोर्डाकडून याआधीच घेतली असल्याचे मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी सांगितले.
दरवाढीनंतरही समस्या मात्र कायम
मोरा - भाऊचा धक्का हा प्रवास फायदेशीर, सुखद आणि शॉर्टकट म्हणून ओळखला जातो. वाहतूककोंडीची दगदग नसल्याने या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय दरवर्षी पावसाळी हंगामात गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग, भाऊचा धक्का ते रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात येते.
मांडवा-अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोरा - भाऊचा धक्का या सागरी मार्गावर गर्दी वाढते. मात्र, तिकीट दरवाढीनंतरही सुविधांमध्ये कोणतीही वाढ होत नाही. उलट प्रवाशांना गळक्या प्रवासी बोटींसह इतर समस्यांचा सामना करावा लागतो.