नोकरभरती प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर;माजी सभागृह नेत्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार
By वैभव गायकर | Updated: January 6, 2024 18:11 IST2024-01-06T18:11:23+5:302024-01-06T18:11:51+5:30
पनवेल महापालिकेचा आकृतिबंधात मंजूर केलेल्या 41 संवर्गातील 377 विविध पदांसाठी नुकताच भरतीप्रक्रिया राबविण्यात आली.

नोकरभरती प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर;माजी सभागृह नेत्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार
पनवेल:पनवेल महानगरपालिकेत होत असलेल्या नोकर भरतीच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर होत असल्याने परेश ठाकुर यांनी दि.5 रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
पनवेल महापालिकेचा आकृतिबंधात मंजूर केलेल्या 41 संवर्गातील 377 विविध पदांसाठी नुकताच भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल झाल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा राज्यातील विविध केंद्रावर पारदर्शकपणे सर्व दक्षता घेऊन डिसेंबर 2023 या कालावधीत पार पडली.या भरती दरम्यान काही जण माजी सभागृह नेते परेश ठाकुर यांच्या नावाचा गैरवापर करून उमेदवारांकडून 15 ते 20 लाखांची मागणी करीत असल्याची चर्चा परेश ठाकुर यांच्या निदर्शनास आली.
नोकरभरती प्रक्रिया रितसर आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांनी देखील नोकरभरतीत कोणीही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधीचे नाव घेऊन पैसे मागत असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे अवाहन केले होते.त्यानुसार परेश ठाकुर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. परिक्षेच्या वेळी पवई येथील केंद्रावर हा प्रकार घडला असल्याचे ठाकुर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
नोकर भरती प्रक्रिया पारदर्शन पद्धतीने सुरु असताना माझ्या नावाचा चुकीचा वापर सुरु असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.या प्रकारामुळे कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून मी स्वतः याबाबत तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी याबाबत दोषींवर कारवाई करावी.
- परेश ठाकूर. माजी सभागृहनेते, पनवेल महानगरपालिका