बेपत्ता झालेली मच्छीमार बोट अखेर सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:08 IST2021-03-13T01:08:32+5:302021-03-13T01:08:53+5:30
बोटीवरील १६ खलाशीही सुखरूप

बेपत्ता झालेली मच्छीमार बोट अखेर सापडली
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : पाच दिवसांपासून खोल समुद्रात बारा नॉटिकल सागरी मैलाबाहेर मासेमारी करण्यासाठी गेलेली १६ खलाशी असलेली बेपत्ता झालेली मच्छीमार बोट अखेर मुंबईपासून अरबी समुद्राच्या १३ तासांच्या अंतरावर सापडली आहे. नेव्ही, अरबी समुद्रातील तटरक्षक दलाच्या मदतीने बोट आणि खलाशांना सुरक्षितपणे मुंबईच्या बंदरात आणण्यात आले आहे.
उरण तालुक्यातील करंजा वैष्णवी माता मच्छीमार संस्थेची ‘मास्टर ऑफ किंगस्’ ही मच्छीमार बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. १६ खलाशी असलेली ही बोट पाच दिवसांपूर्वी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यासाठी निघाली होती. मुंबईपासून १३ तासांच्या अंतरावर खोल समुद्रात असताना बोटीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. इंजिनमधील झालेल्या बिघाडामुळे बोट पाण्याच्या प्रवाहासोबत भरकटत वाहत गेली. याच दरम्यान, बोटीवरील जीपीएस आणि वायरलेस सीस्टिमही बंद पडली. यामुळे संपर्क तुटल्याने बोटीवरील खलाशांच्या अडचणीत वाढ झाली.
बारा नॉटिकल मैलाबाहेर खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छीमारी बोट बंद पडली असल्याची माहिती मिळाल्यानंतर, दुसऱ्या बोटीच्या मदतीने बोटीचा शोध घेण्यात येत होता. मात्र, शोधानंतरही त्यांना बोटीचा ठावठिकाणा लागला नाही. मच्छीमार संस्थेच्या अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी बेपत्ता बोटीची माहिती मत्स्यव्यवसाय, एमआरपीसी विभागालाही दिली. हेलिकॉप्टरच्या मदतीने अरबी समुद्रात शोध घेत असताना मच्छीमार बोट सुरक्षित असल्याचे आढळून आली. सापडलेली मच्छीमार बोट आणि त्यावरील १६ खलाशांना मुंबईच्या ससूनडॉक बंदरात सोडण्यात आले असल्याची माहिती वैष्णवी माता मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी दिली.