अमन लॉज ते माथेरान मिनिट्रेन आजपासून झाली सुरू, पर्यटकांना पायपिटीपासून दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 00:34 IST2020-11-04T00:33:51+5:302020-11-04T00:34:19+5:30
Matheran : नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती, पण शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले.

अमन लॉज ते माथेरान मिनिट्रेन आजपासून झाली सुरू, पर्यटकांना पायपिटीपासून दिलासा
कर्जत : कोविड काळात माथेरान बंद झाल्यानंतर काही दिवसांत मिनिट्रेनही बंद करण्यात आली. तेव्हापासून आत्तापर्यंत मिनिट्रेन बंद होती. २ सप्टेंबरला माथेरान सुरू झाल्यानंतर पर्यटक माथेरानमध्ये येऊ लागले, पण अमन लॉज ते माथेरान हे दोन किलोमीटर अंतर चालताना पर्यटकांची दमछाक होत होती. स्थानिक प्रशासनाने मागणी केल्यानंतर ही मिनिट्रेन शटल सेवा पर्यटकांच्या सेवेसाठी उद्या बुधवार ४ नोव्हेंबरपासून धावणार आहे.
नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मिनिट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती, पण प्रशासनाने राज्य शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. तेव्हा राज्य सरकारने मिनिट्रेन सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार, आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरान-अमन लॉज मिनिट्रेन ३ द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणी आणि २ मालवाहू बोगीसह पर्यटकांच्या सेवेसाठी धावणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
मिनिट्रेनचे वेळापत्रक
माथेरान ते अमन लॉज सकाळी ९.३० आणि सायंकाळी ४ वाजता
अमन लॉज ते माथेरान सकाळी ९.५५ आणि सायंकाळी ४.२५