जसनव्हा केमिकल कंपनीत गुरूवारी पहाटे भीषण स्फोट; २ जण ठार, ८ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 03:01 AM2020-11-06T03:01:16+5:302020-11-06T03:01:45+5:30

Massive explosion at Chemical Company : स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की पाच किमी परिसरामध्ये तो ऐकायला आला. स्फोटामुळे अनेक घरांना तडे गेले आणि खिडक्यांच्या काचाही फुटल्या.

Massive explosion at Jasnava Chemical Company early Thursday morning; 2 killed, 8 injured | जसनव्हा केमिकल कंपनीत गुरूवारी पहाटे भीषण स्फोट; २ जण ठार, ८ जखमी

जसनव्हा केमिकल कंपनीत गुरूवारी पहाटे भीषण स्फोट; २ जण ठार, ८ जखमी

Next

खोपोली : खालापूर तालुक्यातील साजगावजवळील आरकोस इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या जसनव्हा केमिकल कंपनीत गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटामुळे परिसरातील चार ते पाच कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेमध्ये विष्णाई लुबाने (३५) या महिलेचा आणि अन्वर खान (४८) या दोघांचा मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत.
स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की पाच किमी परिसरामध्ये तो ऐकायला आला. स्फोटामुळे अनेक घरांना तडे गेले आणि खिडक्यांच्या काचाही फुटल्या. दरम्यान, स्फोटामुळे लागलेल्या आगीने रौद्ररूप घेतले होते. आठ ते दहा बंबांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर पाच ते सहा तासांनी आग आटोक्यात आली. घटनेचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, विभागीय पोलीस अधीक्षक संजय शुक्ला, खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, अमोल वळसंग, श्रीरंग किसवे, प्रांत वैशाली परदेशी, तहसीलदार चपलवार, ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर व त्यांचे सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
कंपनीत रिॲक्टरमध्ये काही तरी बिघाड झाला होता. पहाटे १.३० च्या सुमारास बॅचचे तापमान वाढायला लागले. 
रिॲक्टरही व्हायब्रेट व्हायला लागला होता. त्यामुळे कामगार तेथून बाहेर पडले. परंतु दुर्दैवाने बाजूलाच राहत असलेल्या कुटुंबातील विष्णाई लुबाने यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला  समोरच्या कंपनीतील अन्वर खान या वॉचमनच्या डोक्यावर शेडचा पत्रा पडल्यामुळे तोही यामध्ये मरण पावल्याची माहिती स्थानिकांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टरांनी तातडीने परिसरामधील अन्य धोकादायक कंपन्यांचीही तपासणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांनी यावेळी केली. 

बुधवारपासून स्थानिकांना त्रास
बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून परिसरातील लोकांना अमोनियाचा वास येत होता तसेच डोळे चुरचुरण्याचा त्रासही होत होता. 
 काही ग्रामस्थांनी याबाबत कंपनीकडे तक्रारही केली होती. आरकोस इंडस्ट्रियल इस्टेटच्या पदाधिकाऱ्यांनीही कारखान्याच्या मालकाला याबाबत कळविले होते.

Web Title: Massive explosion at Jasnava Chemical Company early Thursday morning; 2 killed, 8 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.