जिल्ह्यात मराठी भाषा दिवस उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:42 AM2020-02-28T00:42:28+5:302020-02-28T00:42:38+5:30

मराठी भाषा संवर्धनासाठी प्रतिज्ञा; कवी कुसुमाग्रज यांना वंदन

Marathi Language Day excited in the district; Organizing various events | जिल्ह्यात मराठी भाषा दिवस उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

जिल्ह्यात मराठी भाषा दिवस उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next

कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून राज्यात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने रायगडमध्ये विविध शाळा, महाविद्यालय, संस्था, कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कवी कु सुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन मराठी भाषा संवर्धनाची प्रतिज्ञा करण्यात आली.

‘बोली भाषांचे संवर्धन आवश्यक’
अलिबाग : प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे जागतिक मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
बोली भाषांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. मराठी भाषादिन हा एक दिवस साजरा न करता, तो रोजच साजरा केला पाहिजे. तसेच बोलींचे महत्त्व वाढणे आवश्यक आहे. त्याने भाषा अधिक सशक्त होईल, असे प्राचार्य संजीवनी नाईक यांनी सांगितले. मराठी भाषादिनाचे औचित्य साधून, गेले अनेक दिवस विद्यार्थी मराठीतील प्रत्येक बोलीवर आपले सादरीकरण महाविद्यालयात करीत आहेत. त्यांच्या सर्व लेखांचे सादरीकरण एकत्र करून मराठी विभागाने बोली विशेषांकाची पुस्तिका तयार केली. त्याचे अनावरण प्राचार्य संजीवनी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मराठीतील विविध बोलींवर प्रकाश टाकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राचार्यांनी कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान बोली विषयक सादरीकरणाची चित्रफीत मराठी विभागाने सादर केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील भूमिका पाटील, गौरवी पाटील, संतोष फड, शिवानी शिर्सेकर, निहा काझी, केदार पाटील या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. या वेळी मराठी विभागप्रमुख प्रा. नम्रता पाटील, प्रा. डॉ. ओमकार पोटे, प्रा. डॉ. रसिका म्हात्रे, प्रा. डॉ. प्रगती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

इंदापूरमध्ये ‘पुस्तक पेढी’ उपक्रम
माणगाव : मानवसेवा हीच ईश्वरसेवा या इंदापुरातील ग्रुपतर्फे जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य तसेच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व महाकवी, थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिनानिमित्त इंदापुरात गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी ‘पुस्तक पेढी’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्तविकात संयोजक अविनाश सहस्रबुद्धे यांनी ग्रुपतर्फे राबविलेल्या माजी सैनिक सत्कार, वृक्षारोपण, कविसंमेलन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमांचा उल्लेख केला व यापुढे वाचन चळवळ अधिक गतिमान केली जाईल, असे सांगितले. या पुस्तकपेढी उपक्रमांतर्गत तळाशेत शाळेला २५ पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालय माणगावचे मुख्याध्यापक माधव कुंटे, सेवानिवृत्त शिक्षक मनोहर दांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल, माजी गटसमन्वयक अनंत वारे, माजी शिक्षिका पुष्पा चांदवले, तळाशेत केंद्रप्रमुख स्मिता पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी राजिप शाळा-तळाशेतचे मुख्याध्यापक सुधाकर चावरेकर उपस्थित होते.

वसंतराव नाईक महाविद्यालयात कार्यक्रम
आगरदांडा : मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या वेळी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, मराठी विभागीय अधिकारी डॉ. श्रीशैल बहिरगुंडे आदी उपस्थित होते.

गोरेगावमध्ये मराठी ग्रंथदिंडीचे आयोजन
माणगाव : कोकण मराठी साहित्य परिषद गोरेगाव शाखा, दोशी वकील कला महाविद्यालय आणि ना. म. जोशी विद्याभवनच्या संयुक्त विद्यमाने गोरेगावमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी ना. म. जोशी विद्याभवनमधून ग्रंथदिंडी काढण्यात आली. शाळेमध्ये प्रारंभी प्राचार्य राजेंद्र पवार आणि विजयराज खुळे, सरपंच जुबेर अब्बासी यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ही दिंडी संपूर्ण गोरेगावमध्ये फिरवून, राजमाता जिजाई मैदानावर या दिंडीचा समारोप करण्यात आला. या वेळी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
या दिंडीमध्ये कोमसापचे अध्यक्ष मंदार म्हशेळकर, सचिव केदार खुळे, युवा विभागप्रमुख चंद्रकांत गोरेगावकर, युवतीप्रमुख वैष्णवी पितळे, किशोर भोसले, सुधीर नागले, भारत गोरेगावकर, युवराज मुंढे, वसंत शिगवण, प्रचार्य राजेंद्र पवार, प्रदीप चेरफळे आदीसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान, बुधवारी दोशी वकील महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे काव्य संमेलन पार पडले. या वेळी प्राचार्य ठाकूर, प्र. ढोले, केदार खुळे, मंदार म्हशेळकर, प्रकाश मेहता, अपूर्वा पांचाल, वैष्णवी पितळे, चंद्रकांत गोरेगावकर, यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी सुमारे २५ विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज, सुरेश भट, मंगेश पाडगावकर यांच्या कविता सादर केल्या. या वेळी कोमसापला गेल्या २० वर्षांत ज्यांनी सहकार्य केले. त्या संस्थांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले, तर काव्यसंमेलनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

‘मराठी जाणण्यासाठी वाचन करा’
पोलादपूर : आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची समृद्धता जाणून घेण्यासाठी मराठी भाषेचा इतिहास आणि जुन्या काळातील मराठी भाषेची विविध पाठ्यपुस्तके यांचे आवर्जून वाचन करावे, असे आवाहन प्राचार्य अंकुश केंगारे यांनी केले. येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी राजभाषा दिवस साजरा केला. या वेळी कें गारे बोलत होते. या वेळी सीमा साने, शिल्पा सकपाळ, रुचिता निकम, अर्चना सुकाळे, श्रुतिका सकपाळ, नम्रता कारंडे या विद्यार्थिनींनी मराठी भाषा गीत सादर केले. या वेळी मराठी निबंध स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाºया दीप्ती सकपाळ, प्रणिता साळवी, सोनाली सोनावणे या विद्यार्थिनींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त के ला, त्यांना गौरविण्यात आले.

नेरळ रेल्वे स्थानकात रांगोळीतून शुभेच्छा
नेरळ : मराठी भाषा दिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेरळ रेल्वे स्थानकात मराठी भाषेबद्दल माहिती देणारी रांगोळी काढण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार युनिटच्या नेरळ-शेलू-वांगणी युनिटच्या माध्यमातून ही रांगोळी काढली.
२७ फेब्रुवारी कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून राज्यात मराठी भाषा दिवस साजरा होत असताना नेरळ रेल्वे स्थानकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सलग दुसºया वर्षी प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी भली मोठी रांगोळी काढण्यात आली.
राजमुद्रा आणि मराठी आमुची मायबोली असा मजकूर असलेल्या या रांगोळीच्या माध्यमातून नेरळ स्थानकातून प्रवास करणाºया सर्व प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार युनिटने केला आहे.

महाडमध्ये ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन
दासगाव : महाडमध्ये मराठी राजभाषा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. महाडमधील संस्कारधाम विद्यालयात इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी इतिहासकालीन शस्त्राबाबत माहिती जाणून घेतली.
साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस राज्यात मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. महाडसह पोलादपूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये, शासकीय कार्यालयात, महाविद्यालयातून हा दिवस साजरा केला. पुस्तकांचे वाचन या वेळी विविध ठिकाणी करण्यात आले. महाडमधील शाळांमधून कुसुमाग्रजांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी मनोगतही व्यक्त केले.
महाडमधील संस्कारधाम विद्यालयात इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शन कोकण कडा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. महाडमधील कोकण कडा मित्रमंडळाचे सुरेश पवार यांनी या शस्त्रांचा संग्रह केला आहे. या शस्त्र आणि नाणी प्रदर्शनाचे उद्घाटन महाड पंचायत समितीच्या वरिष्ठ विस्तार अधिकारी सुनिता पालकर यांनी केले.

मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा - टेकळे
म्हसळा : मराठी भाषेचा विकास, मराठीतील महत्त्वाचे साहित्य तसेच मराठी ही भारतातील तिसºया क्रमांकावर बोलली जाणारी भाषा असल्याचे मराठी भाषा आणि साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिगंबर टेकळे यांनी सांगितले.
येथील वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात प्रा. दिगंबर टेकळे यांनी आपले विचार मांडले.
मराठी भाषकांनी मराठी विश्वकोश, शब्दकोश आणि मराठी भाषा विभाग या शासकीय संकेत स्थळाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. राघव राव यांनी मराठी भाषा दैनंदिन व्यवहारात जाणिवपूर्वक वापरणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वेळी प्राचार्य डॉ. व्ही. एस. एन. राव आदी उपस्थित होते.

Web Title: Marathi Language Day excited in the district; Organizing various events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.