स्वार्थासाठी अनेकांचा स्वाभिमान गहाण; आनंदराज आंबेडकर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 07:09 IST2024-12-26T07:08:29+5:302024-12-26T07:09:00+5:30
देशात असलेल्या आताच्या सरकारमुळे संविधान धोक्यात

स्वार्थासाठी अनेकांचा स्वाभिमान गहाण; आनंदराज आंबेडकर यांची टीका
महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. मात्र, स्वाभिमान गहाण ठेवून अनेकजण आपला स्वार्थ साधत आहेत, अशी टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी महाड येथे केली, मनुस्मृती दहन दिनाचा ९७ वा स्मृतिदिन बौद्धजन पंचायत समिती आणि विकास वंचित महिला मंडळाच्या वतीने महाडमध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
देशात असलेल्या आताच्या सरकारमुळे संविधान धोक्यात आले असून, बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली. मनुस्मृती दहन दिन आणि चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन या दोन्ही कार्यक्रमांना स्थानिक भूमिपुत्रांची उपस्थिती कमी असते, हे प्रकर्षाने जाणवते, असे सांगितले. महिला परिवर्तन घडवून आणतात. परंतु त्याच महिलांनी या राज्यात मनुवाद्यांना निवडून दिले, असा घणाघात करत आपल्याला एक होऊन लढा दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी वंचित विकास महिला मंडळाच्या डॉ. प्रमिला संपत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.