मोठी दुर्घटना टळली! मच्छिमार बोट बुडाली; १५ खलाशी बचावले
By निखिल म्हात्रे | Updated: January 7, 2025 19:41 IST2025-01-07T19:40:53+5:302025-01-07T19:41:50+5:30
सोमवारी रात्री कुलाबा किल्ल्याजवळ मच्छीमारी करण्यासाठी हिरकन्या हि बोट उभी होती, बोटीवरील खलाशी थकून झोपले होते.

मोठी दुर्घटना टळली! मच्छिमार बोट बुडाली; १५ खलाशी बचावले
अलिबाग - येथील खोल समुद्रात मच्छीमारीसाठी उभी असलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाली. या बोटमालकाचे २० लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे बोटीत असलेल्या १५ खलाशांचा जीव वाचला आहे. बोट बाहेर काढण्यसाठी १७ तासांचा अधिक काळ लोटला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोमवारी रात्री कुलाबा किल्ल्याजवळ मच्छीमारी करण्यासाठी हिरकन्या हि बोट उभी होती, बोटीवरील खलाशी थकून झोपले होते. बाहेर जोराचा वार सुटला होती. या वाऱ्यामुळे बोट भरकटली गेली, काही काळाने बोटीत पाणी भरल्याने बोट बुडू लागली. हा प्रसंग समोरून येणाऱ्या बोट चालकाच्या लक्षात येताच, त्याने ओरड करण्यास सुरुवात करीत बोटीत असलेल्या खलाशांना जागे केले.
त्यानंतर जागे झालेल्या खलाशांनी दुसऱ्या होडीत आश्रय घेत सुटकेचा निश्वास टाकला होता. त्यानंतर बोट मालकाला हा प्रसंग सांगितला. एक एक करीत सर्व मच्छीमार बोट बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करू लागले होते. बोटीतील १५ लाख रुपयांची जाळी तर यंत्र सामुग्री निकामी झाली आहे. साधारण १७ तासांच्या अथक परीश्रमानंतर बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.
पहाटेच्या सुमारास बोट बुडाल्याचे आम्हाला कळताच आम्ही दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचलो. या बोटीला खेचत जटेटीवर आणले. या दुर्घटनेमुळे आमचे २० लाखाचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जगदीश बामजी यांनी दिली.
सध्या पहाटेच्या सुमारास चांगलीच वायखळ आहे. या सोसाट्याच्या वायखळीमुळे हा प्रसंग घडला आहे. अनेकवेळा असे नुकसान होत असते, आमच्या मदतीला सरकार कधीच धाऊन येत नाही, असे मच्छीमार जनार्दन नाखवा यांनी सांगितले.