Vidhan sabha 2019 : तब्बल २४ वर्षांनी तटकरे-घोसाळकर सामना, श्रीवर्धनमध्ये कार्यकर्ते लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:49 AM2019-10-01T02:49:45+5:302019-10-01T02:50:26+5:30

- मिलिंद अष्टीवकर रोहा : श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार अदिती तटकरे यांचा प्रचार सोशल मीडियावर सुरू झाला ...

Maharashtra Vidhan sabha 2019: After 24 years Tatkare-Ghosalkar Face to face In Shrivardhan | Vidhan sabha 2019 : तब्बल २४ वर्षांनी तटकरे-घोसाळकर सामना, श्रीवर्धनमध्ये कार्यकर्ते लागले कामाला

Vidhan sabha 2019 : तब्बल २४ वर्षांनी तटकरे-घोसाळकर सामना, श्रीवर्धनमध्ये कार्यकर्ते लागले कामाला

googlenewsNext

- मिलिंद अष्टीवकर

रोहा : श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार अदिती तटकरे यांचा प्रचार सोशल मीडियावर सुरू झाला असून त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. रविवारी शिवसेनेकडून उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे तर दुसरीकडे २४ वर्षानंतर पुन्हा तटकरे विरुद्ध घोसाळकर हा सामना मतदारसंघात पहायला मिळणार आहे.

श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार ? या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळण्याचे अधिकृत संकेत प्राप्त झाले आहेत. श्रीवर्धन विधानसभेसाठी शिवसेनेकडून अखेर उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नाव निश्चित झाले आहे. सेनेचे संभाव्य उमेदवार घोसाळकर यांनी रविवारी सायंकाळी रोहा मतदारसंघात अधिकृत दौरा केला. तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या निवासस्थानी सेनेचे त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. श्रीवर्धनसाठी राष्ट्रवादीकडून आदिती तटकरेंच्या नावाची घोषणा झाली. त्यांच्या विरोधात सेनेकडून रवी मुंडे, अ‍ॅड. राजीव साबळे, अनिल नवगणे, अवधूत तटकरे, समीर शेडगे यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार , या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये तटकरे विरुध्द तटकरे अशी लढत होण्याची संभावना होती. तटकरेंना उमेदवारी जाहीर झाली असती तर श्रीवर्धन मतदार संघात तटकरें सोबत कायम संघर्ष करणाऱ्या सेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची अवधूत तटकरेंचे काम करताना कुठेतरी कुचंबना झाली असती.

लोकसभा निवडणुकीत तत्कालीन जिल्हाप्रमुख रवी मुंडे यांच्या तळा तसेच म्हसळा तालुक्यात सेना मोठया प्रमाणात पिछाडीवर गेली आणि सुनिल तटकरें यांना या तालुक्यांत मोठे मताधिक्य मिळाले होते. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेनेच्या गोटात दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख रवी मुंडे यांच्या कार्यपद्धतीबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी होती. श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि रोहा तालुक्यात याचे प्रत्यय आले. अनेक नेत्यांनी मधल्या काळात सेनेला जय महाराष्ट्र केले. त्यामुळे शिवसेनेत मोठी गळती लागली. दरम्यानच्या काळात सेनेच्या पक्ष प्रमुखांनी या विधानसभा क्षेत्रात कोणतेही बदल न केल्याने, तसेच या मतदारसंघाकडे दूर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत याची मोठी किंमत शिवसेनेला भोगावी लागली.

२०१४ मध्ये ७५ मतांनी पराभूत व्हावे लागलेल्या रवी मुंडे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांना ३८ हजारांचे मोठे मताधिक्य मिळाले होते. या निकाला नंतर सेनेच्या गोठात मोठी नाराजी आणि मरगळ आली होती. अदिती तटकरे यांच्या समोर सेनेचा उमेदवार कोण हे ही स्पष्ट होत नसल्याने ही निवडणूक वन साईड होते की काय? असे गेले काही दिवस दिसणारे चित्र विनोद घोसाळकर यांचे अधिकृत संकेत मिळाल्याने एकदम पालटले आहे.

श्रीवर्धनमध्ये राष्टÑवादीकडून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. आता शिवसेनेकडून विनोद घोसाळकर याचे नाव निश्चित करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ही निवडणूक रंगणार असल्याची चर्चा आहे.

बाजी कोण मारणार याची उत्सुकता
‘श्रीवर्धनमध्ये सेनेकडून विनोद घोसाळकर उमेदवारी करणार’ या वृत्ताने मतदारसंघातील शिवसैनिकांत चैतन्याची भावना निर्माण झाली आहे. घोसाळकर हे सर्व बाजूने सक्षम असून, कुठल्याही परिस्थितीत ते आपल्या राजकीय विरोधकांशी तडजोड करीत नाहीत, हा सैनिकांचा मागील निवडणुकीत अनुभव असल्याने, सेना सोडून गेलेले आणि साइड ट्रॅकला झालेले अनेक शिवसैनिक पुन्हा स्वगृही येण्यास सुरुवात होणार आहे. त्यापैकी काही जण रविवारी प्रत्यक्ष भेटल्याने घोसाळकर यांच्या उमेदवारीला सेनेतून पसंती मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. आता तटकरे विरुद्ध सेनेचे विनोद घोसाळकर असा सामना तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा पाहायला मिळणार आहे. त्यात मुख्यत: तटकरे विरुद्ध घोसाळकर कोण बाजी मारणार? यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: After 24 years Tatkare-Ghosalkar Face to face In Shrivardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.