महाड शहर डेंग्यूग्रस्त घोषित

By Admin | Updated: August 7, 2015 23:11 IST2015-08-07T23:11:08+5:302015-08-07T23:11:08+5:30

गेल्या महिनाभरापासून महाड शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर महाड शहर डेंग्यूग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती शासकीय

Mahad city declares dengue | महाड शहर डेंग्यूग्रस्त घोषित

महाड शहर डेंग्यूग्रस्त घोषित

महाड : गेल्या महिनाभरापासून महाड शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर महाड शहर डेंग्यूग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी शुक्रवारी झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. महाड शहरात १६७ तर ग्रामीण भागात १४ रुग्ण डेंग्यूबाधित असल्याची माहितीही डॉ. जगताप यांनी यावेळी दिली.
महाड नगरपरिषद प्रशासनाला शहरात स्वच्छतेबाबतची काळजी घ्यावी अशा सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यादृष्टीने नगरपरिषदेने शहरात जंतूनाशक फवारणी नगरपरिषदेकडे, एकच फॉगिंग मशिन उपलब्ध असल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत यासाठी नगरपरिषदेला आणखी चार फॉगिंग मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आरोग्य यंत्रणा सतर्क असून गुरुवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खंडागळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागांवकर, डॉ. गायकवाड आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराला भेट देवून नगरपरिषद प्रशासनाशी उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानुसार शुक्रवार संपूर्ण शहरात प्रत्येक कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेवून जनजागृती व उपाययोजना करण्यासाठी १७ पथके पाठवण्यात आली आहेत. तापाने त्रस्त रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी खाजगी पॅथॉलॉजिस्ट मनमानी करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांच्याकडून अवास्तव तपासणी शुल्क आकारले जात आहे. मात्र पॅथॉलॉजिस्टनी सद्यस्थितीत ४५० रुपयेपेक्षा अधिक शुल्क रुग्णांकडून आकारू नये अशा सूचना सर्व पॅथॉलॉजिस्टना देण्यात येतील, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.
स्वच्छतेबाबत नगरपरिषद प्रशासनाने अधिक सतर्कपणे व जागरुकपणे काम करावे, असे डॉ. जगताप यांनी सांगितले. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून सर्वत्र जंतुनाशक फवारणी केली जात असली तरी मुख्य रस्त्यावरील तुंबलेले गटार व नाले कचऱ्याने भरलेल्या कचराकुंड्या ही परिस्थिती शहरात सर्वत्र दिसून येत आहे. डोंगरपूल, प्रभात कॉलनी, सरेकर आळी, गवळआळी या परिसरात दुर्गंधीचे पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Mahad city declares dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.