Panvel Crime | पनवेल तालुक्यात ७६ लाखांचा मद्यसाठा जप्त, कोपरा गावाच्या हद्दीतीतील घटना
By वैभव गायकर | Updated: December 18, 2022 17:08 IST2022-12-18T17:07:09+5:302022-12-18T17:08:10+5:30
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Panvel Crime | पनवेल तालुक्यात ७६ लाखांचा मद्यसाठा जप्त, कोपरा गावाच्या हद्दीतीतील घटना
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: सायन पनवेल महामार्गावरील कोपरा गावाच्या हद्दीत तब्बल ७६ लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी, १७ डिसेंबरला जप्त केला. नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या दारूची आवक महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती.
त्याआधारे जिल्ह्याच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय पुरळकर यांच्या पथकाने सापळा कोपरा टोल नाक्यावर ट्रक क्रमांक जीजे.06, बीटी 9717 यास अडवून त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित रॉयल ब्लु व्हिस्कीच्या बाटल्या असे एकूण अवैध गोवा मद्याचे 898 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी संदीप पंडित (38) ट्रक चालक व समाधान धर्माधिकारी (30) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आल्या.पनवेल परिसरात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बनावट व बेकायदेशीर दारूची विक्री केली जाते.उत्पादन शुल्क विभागाने या अनधिकृत मद्यसाठा व विक्री करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.