चिरनेर-दिघाटी परिसरातील जंगलात बिबट्या; खबरदारी घेण्याचे वनविभागाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 16:00 IST2023-09-25T15:57:09+5:302023-09-25T16:00:01+5:30
उरण -पनवेल परिसरातील कर्नाळाच्या जंगलातून बिबट्यांचा वावर असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे.

चिरनेर-दिघाटी परिसरातील जंगलात बिबट्या; खबरदारी घेण्याचे वनविभागाचे आवाहन
मधुकर ठाकूर
उरण - चिरनेर-दिघाटी परिसरात एका बिबट्याची ललकारी घुमल्याने खळबळ उडाली आहे.हा बिबट्या हायवे ओलांडून जाताना दिघाटी येथील एका शेतकऱ्याच्या दृष्टीस पडला आहे.
उरण -पनवेल परिसरातील कर्नाळाच्या जंगलातुन बिबट्यांचा वावर असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे.चिरनेर, रानसई, विंधणे येथील जंगल परिसरात याआधीही बिबट्यांचा वावर असल्याच्या खाणाखुणाही आढळून आल्या आहेत. येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही बिबट्यांच्या वावराबाबत अनेकदा पुष्टी केली आहे.
रविवारी दिघाटी येथील एक शेतकरी जयवंत पाटील शेतात पीकाची पाहणी करीत असताना त्यांना दिघाटी आणि साई मेन हायवे क्रॉस करताना बिबट्या दिसला होता.त्यांनी चिरनेर येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य असलेल्या प्राणीमित्र असलेल्या बंधुनाही बाब सांगितली. त्यांनीही तत्काळ बिबट्यांची बाब वनविभागाला कळविली.
बिबट्याच्या वावराची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी नथुराम कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी संतोष इंगोले,भाऊसाहेब डिव्हिलकर यांनी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी , सदस्य महेश भोईर, अभिमन्यू पाटील, मनोहर फुंडेकर यांच्या मदतीने सुमारे तीन तास जंगलात शोध मोहीम राबवली.या शोधमोहिमेत बिबट्याच्या पायांचे ठसे ठिकठिकाणी चिखलात उमटलेले आढळून आले.आढळून आलेल्या पायाच्या ठशांवरुन वयात आलेल्या बिबट्याचे असल्याची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी दिली.
चिरनेरपासुन कर्नाळापर्यंत जंगल पसरलेले आहे.या जंगल परिसरात बिबट्याचा असलेला वावर लपून राहिलेले नाही.त्यामुळे परिसरातील नागरिक आणि रहिवाशांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन उरण वनविभागाचे आरएफओ नथुराम कोकरे यांनी केले आहे.