नागावमध्ये भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ, दोन युवकावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:43 IST2025-12-09T12:39:05+5:302025-12-09T12:43:38+5:30
Raigad News: अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात खालची आळी येथे आज सकाळी भरदिवसा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. बिबट्याने दोन नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळत असून एक तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नागावमध्ये भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ, दोन युवकावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अलिबाग - अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात खालची आळी येथे आज सकाळी भरदिवसा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. बिबट्याने दोन नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळत असून एक तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर नागावसह अलिबागमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याची माहिती कळताच वन अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.
आज 9 डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागावमधील बालू सुतार यांच्या समोरील वाडी परिसरात प्रथम बिबट्या दिसला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, “बिबट्या खूप मोठा आहे, कंबरेएवढा उंच. अनेक लोकांनी त्याला पाहिले असून तो अत्यंत आक्रमक स्वरूपात फिरताना दिसला,” असे त्यांनी सांगितले. यानंतर बिबट्या एचडीएफसी बँकजवळील परिसरातून पुढे हालचाल करत नागा वाडीकडे गेला. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, “आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बिबट्या पाहिला. तो खूप आक्रमक आहे आणि अंगावर झेप घेण्याचाही प्रयत्न केला. मंदार वर्तक यांच्या वाडीमार्गे तो मागच्या वाडीकडे गेला. परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.”
घटनेची गंभीरता लक्षात घेता स्थानिकांनी तातडीने शाळेला माहिती दिली. शाळा प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वरच्या हॉलमध्ये सुरक्षित ठिकाणी बसवले आहे. पालकांना मुलांना ताबडतोब घरी घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागावमध्ये बिबट्या आला असून दोन जणांवर हल्ला केला आहे. नागाव मध्येे भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. वन विभाग आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशी माहिती सरपंच हर्षदा मयेकर यांनी दिली. दरम्यान, घटना समजताच वन विभागाची पथकं नागावकडे रवाना झाली असून बिबट्या शोधण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.