अलिबागमधील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बिबट्याचा धुमाकूळ, दोन जणांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:07 IST2025-12-12T12:06:07+5:302025-12-12T12:07:23+5:30
Alibag Leopard News: नागावमधून पळालेला बिबट्या आक्षी गावामध्ये दिसला आहे. वन विभागाचे रेस्क्यू पथक बिबट्याचा शोध घेत आहे. नागावसह आक्षी गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलिबागमधील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बिबट्याचा धुमाकूळ, दोन जणांवर हल्ला
अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात १० डिसेंबर रोजी आलेला बिबट्या वन प्रशासनाला चकमा देत पळून गेला होता. शुक्रवारी (१२ डिसेंबर) हा बिबट्या आक्षी समुद्रकिनारी दिसला असून, दोन जणांवर हल्ला चढून पसार झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आनंदकुमार विशाल, लोकनाथ हे दोघे जखमी झाले आहेत. वन विभागाचे रेस्क्यू पथक बिबट्याचा शोध घेत आहे. नागावसह आक्षी गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी (१० डिसेंबर) नागाव परिसरात सकाळी साडे नऊ वाजता बिबट्या आल्याची बोंब झाली. यामुळे नागावमध्ये नागरिक भयभीत झाले. वन आणि पोलीस विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन सकाळपासून बिबट्याचा शोध घेत होते.
बिबट्या चकमा देऊन सैरावैरा पळत होता. रात्री नऊपर्यंत शोध घेऊन मोहीम थांबवण्यात आली होती. बिबट्याने सहा जणांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर बिबट्या पसार झाला होता.
तो बिबट्या आक्षीमध्ये दिसला
गुरुवारी पुन्हा रेस्क्यू पथकामार्फत शोध मोहीम सुरू केली होती. मात्र बिबट्याचा शोध लागला नाही. त्यामुळे बिबट्या आपल्या अधिवासात गेला असल्याचे वन विभागाकडून बोलले जात होते. मात्र शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आक्षी गावात बिबट्या आल्याचा गोंगाट झाला.
बिबट्याने दोन जणांवर हल्ला केला आणि पसार झाला आहे. वन विभागाचे रेस्क्यू पथक बिबट्याचा शोध घेत आहे.