दोडामार्ग नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:16 IST2018-05-20T00:16:25+5:302018-05-20T00:16:25+5:30
भाजपच्या चार सदस्यांनी व्हीप डावलत सेनेला मतदान ; स्वाभिमानच्या उपमा गावडे यांचा पराभव

दोडामार्ग नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी बजावलेला व्हीप डावलत पाचपैकी चार नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्याने कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अखेर शिवसेनेच्या लीना कुबल विजयी झाल्या. त्यांनी स्वाभिमानच्या उपमा गावडे यांचा ९ विरूद्ध ५ मतांनी पराभव केला. उपनगराध्यक्षपदी भाजपाचे गटनेते चेतन चव्हाण विजयी झाले. त्यांनी स्वाभिमानच्या हर्षदा खरवत यांचा ९ विरूद्ध ७ मतांनी पराभव केला.
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत एकूण १७ नगरसेवक आहेत. शिवसेनेचे ४, भाजपचे ५, स्वाभिमानचे ५, राष्टÑवादीचे २ व मनसेचा एक असे पक्षीय बलाबल आहे.
नगराध्यक्ष व उपनगराध्यपदासाठी शनिवारी निवडणूक होती. भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी रेश्मा कोरगावकर, स्वाभिमानकडून उपमा गावडे तर सेनेकडून लीना कुबल यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, भाजपाच्या पाचपैकी चार नगरसेवकांनी कोरगावकर यांच्या नावास विरोध करीत बंडाचे निशाण फडकावले होते. गेल्या चार दिवसांपासून भाजपाच्या या चार नगरसेवकांचे दूरध्वनीही ‘नॉट रिचेबल’ होते. कोरगावकर यांना मतदान करण्याबाबत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी व्हीप बजावला होता. हे चारही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात होते. नगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले.