आकुर्ले परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:13 IST2019-07-15T00:13:08+5:302019-07-15T00:13:11+5:30
कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या आकुर्ले येथील टाकीला गळती लागली आहे.

आकुर्ले परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीला गळती
कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या आकुर्ले येथील टाकीला गळती लागली आहे. या टाकीची नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पाहणी केली आहे, या वेळी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या १०० टक्के अनुदानातून कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर केले होते. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण केले. त्यानंतर ही पाणी योजना प्राधिकरणाने नगरपरिषदेच्या ताब्यात दिली. मात्र, योजनेच्या कामात अनेक त्रुटी असताना उद्घाटनाच्या हट्टापायी त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी ही योजना ताब्यात घेतली, त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाला आज पाणीपुरवठा योजनेबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील आकुर्ले परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी एक लाख ८० हजार लीटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीला काही वर्षांनंतर गळती लागली होती, नगपरिषद प्रशासनाने या टाकीची गळती काढण्याचे काम काही वर्षांपूर्वी केले होते. मात्र, आता या टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने या परिसरातील नागरिकांची नेहमीच तक्रार असे आणि गळतीमुळे पाणी वाया जात असे. या गळक्या टाकीची पाहणी शुक्रवारी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी केली. या वेळी त्यांच्या समवेत स्थानिक नगरसेविका प्राची डेरवणकर, स्वामिनी मांजरे, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, जल अभियंता अशोक भालेराव, नीलेश चौडीए, सुदाम म्हसे, पाणी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
या टाकीची गळती काढण्याचे काम सुरू केल्यावर या परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल किंवा या परिसरात नवीन टाकी बांधावी लागल्यास त्यासाठी नवीन जागा शोधावी लागेल, या वेळी याच परिसरात दोन जागेची पाहणीसुद्धा करण्यात आली. याबाबत सभेमध्ये लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्षा जोशी यांनी सांगितले.