भूमाफियांचा हैदोस

By Admin | Updated: June 14, 2016 01:27 IST2016-06-14T01:27:03+5:302016-06-14T01:27:03+5:30

कर्जत, नेरळ व परिसरातील सर्वच भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, भरावासाठी डोंगर फोडून माती काढण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा जेसीबीच्या साहाय्याने डोंगर फोडले जात आहेत.

Landfill Hedos | भूमाफियांचा हैदोस

भूमाफियांचा हैदोस

- कांता हाबळे, नेरळ

कर्जत, नेरळ व परिसरातील सर्वच भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, भरावासाठी डोंगर फोडून माती काढण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा जेसीबीच्या साहाय्याने डोंगर फोडले जात आहेत. परंतु डोंगर फोडून माती काढणाऱ्यांवर करवाई होताना दिसत नाही. नियम धाब्यावर बसवून माती उत्खनन होत असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कर्जत तालुक्यासह नेरळ परिसरात जमीन सपाट करण्याचीही कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे जमिनीमध्ये जेसीबी फिरवत असताना त्याची रीतसर परवानगी रॉयल्टी भरून घ्यावी लागते. मात्र अशी परवानगी फार कमी प्रमाणात घेऊन कामे सुरू आहेत. महसूल खात्याचा महसूल बुडत असताना मात्र तलाठी व त्यांचे अधिकारी म्हणून काम करणारे महसूल मंडळ अधिकारी यांची भूमिका माती उत्खनन प्रकारात संशय निर्माण करणारी असल्याचे बोलले जात आहे. अशी कामे सुरू असताना कर्जत तालुक्यात महसूल खात्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांना अशी मोहीम राबविण्याचे अधिकार नाहीत का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र महसूल खात्याकडून बेकायदा माती व रेती उत्खननावर करवाई केली जात आहे. मात्र कर्जत तालुक्यात असे होताना दिसत नाही, रेती जमीन सपाटीसाठी माती रॉयल्टीतून महसूल जरी मिळत असला तरी त्यातून होणारी निसर्ग आणि पर्यावरणाची हानी कितीतरी धोक्याची व तोट्याची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नियमांची पायमल्ली; डोंगर उद्ध्वस्त
नियमाप्रमाणे तहसीलदारास १०० ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी असते. त्यानंतर अधिक ५०० ब्रास गौण खनिज उत्खननासाठी परवानगी प्रांत कार्यालयातून काढली जाते. यापेक्षा अधिक २०० ते १००० पर्यंतच्या ब्रासच्या गौण खनिज उत्खननासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला परवानगी देण्याचा अधिकार असतो. त्यापेक्षा अधिक उत्खननासाठी जिल्हाधिकारी व मंत्रालयातून परवानगी काढली जाते. परंतु कर्जत तालुक्यात विकासकांकडून लहान - मोठे डोंगर उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियमानुसार उत्खनन होते का, यावर महसूल खात्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

नेरळमधील काही ठिकाणी सुरु असलेल्या माती उत्खननाची रॉयल्टी भरलेली आहे. ज्या ठिकाणची रॉयल्टी भरलेली नाही अशा त्याठिकाणी तलाठी, मंडळअधिकारी यांना पाठवून चौकशी करून त्यांच्यावर करवाई करण्यात येईल.
- रवींद्र बाविस्कर,
तहसीलदार, कर्जत

नेरळ परिसरात ज्या ज्या ठिकाणी माती उत्खनन सुरू आहे, अशा ठिकाणची पाहणी करून ज्यांनी रॉयल्टी भरली नसेल अशा माती उत्खनन करणाऱ्यांवर करवाई करण्यात येईल.
- एच. एम. सरगर,
मंडळ अधिकारी, नेरळ

दहीवली - देवपाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू आहे. त्याची कोणतीही रॉयल्टी भरलेली नाही. या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे कोणतेही वाहन आढळून आले नाही. या संदर्भात तहसील कार्यालयात कळविले आहे.
- जयश्री मोरे, तलाठी, दहीवली

Web Title: Landfill Hedos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.