खोपोलीत महिलेला भूल देऊन दागिने लंपास; खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:44 IST2019-02-10T23:44:24+5:302019-02-10T23:44:32+5:30
येथे रविवारी दुपारी एका महिलेला दोन भामट्यांनी मोगलवाडी मार्गावर गाठून आपल्याला भूक लागल्याचे सांगून काहीतरी खायला द्या, अशी विनंती करत भूल देऊन तिच्याकडील दागिने काढून घेऊन भामटे पसार झाले.

खोपोलीत महिलेला भूल देऊन दागिने लंपास; खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
खोपोली : येथे रविवारी दुपारी एका महिलेला दोन भामट्यांनी मोगलवाडी मार्गावर गाठून आपल्याला भूक लागल्याचे सांगून काहीतरी खायला द्या, अशी विनंती करत भूल देऊन तिच्याकडील दागिने काढून घेऊन भामटे पसार झाले. या घटनेनंतर या महिलेला काही वेळ काहीच कळाले नाही. मात्र, शुद्धीवर आल्यावर आपली फसवणूक करून सोने चोरले असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
खोपोली शहरात घरकाम करणारी महिला सुनीता मोरे (रा. वर्धमान नगर) या दैनंदिन घरकामे करून दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घरी जात असताना मोगलवाडी मार्गावरील हायवेच्या कॉर्नरजवळ ही महिला आल्यावर दोन अनोळखी व्यक्तींनी समोर येऊन ताई आम्ही खूप लांबून आलोय, खूप भूक लागली आहे, काहीतरी मदत करा, अशी विनवणी के ली. त्या वेळी सुनीता मोरे यांनी बाजूच्या हॉटेलमध्ये त्यांना वडापाव खायला दिला. या वेळी चर्चा करताना सुनीता मोरे यांना भूल देऊन त्यांच्याकडील रुमाल काढून समोर केले, त्या वेळी सुनीता यांनी त्यांच्या गळ्यातील चेन व कानातले असे एक तोळे सोने त्या रु मालात काढून दिले. या दरम्यान सुनीता यांना आपण काय करतोय हे कळालेच नाही. त्याबदल्यात या भामट्याने सुनीता यांना पैशाची गड्डी म्हणून वरती एक शंभरची नोट व त्याखाली कागदाचे नोटांच्या आकाराचे तुकडे दिले आणि काही कळायच्या आत हे भामटे पसार झाले.
या घटनेच्या काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या सुनीता यांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली.
- ही घटना घडल्यानंतर सर्वत्र या भामट्यांचा शोधण्याचा प्रयत्न सुनीता मारे यांनी केला. मात्र, या दोघा भामट्यांनी त्या ठिकाणाहून पलायन केल्याने सुनीता मोरे यांनी तत्काळ खोपोली पोलीस ठाणे गाठून आपली फसवणूक केल्याची तक्र ार दिली.