कोकण विभागीय शिक्षक आमदार निवडणूक: रायगडची १० हजार मते कोणाच्या पारड्यात?
By जमीर काझी | Updated: January 30, 2023 09:29 IST2023-01-30T09:28:25+5:302023-01-30T09:29:23+5:30
Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या कोकण शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रायगड जिल्ह्यात जोरदार धुमश्चक्री पाहावयास मिळत आहे.

कोकण विभागीय शिक्षक आमदार निवडणूक: रायगडची १० हजार मते कोणाच्या पारड्यात?
- जमीर काझी
अलिबाग : राज्यातील सत्ताबदलानंतर प्रथमच होत असलेल्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रायगड जिल्ह्यात जोरदार धुमश्चक्री पाहावयास मिळत आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांचा समावेश असलेल्या या निवडणुकीसाठी ठाण्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार १०१ मतदार असून, ते निर्णायक ठरणार आहेत.
कोकण विभागाच्या शिक्षक आमदारासाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, प्रामुख्याने लढत विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील व भाजप-शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात होणार आहे. रायगड जिल्ह्यातून दोघांपैकी कोणाच्या पारड्यात जास्त मते जाणार त्यालाच विजयाचा गुलाल लागणार आहे. त्यामुळे ही जास्तीत जास्त मते आपल्या उमेदवाराला मिळावीत यासाठी शेकाप, दोन्ही काॅंग्रेस, शिवसेनेची नेते मंडळी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे पाचही जिल्ह्यांत फिरत आहेत, तर म्हात्रेंच्या विजयासाठी पालकमंत्री उदय सामंत, जिल्ह्यातील शिंदे गटाच्या तीनही आमदारांनी पद्धतशीर प्रचारावर भर दिला आहे.
महिलांचे मत निर्णायक
या निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ३८ हजार ५२९ आहे. त्यामध्ये महिला २१,५२० व पुरुष मतदारांची संख्या १७ हजार ९ आहे. महिलांची संख्या ४,५११ अधिक असल्याने त्यांच्या मताला अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे.