वायुप्रदूषणामुळे कोंडतोय श्वास
By Admin | Updated: August 6, 2015 02:57 IST2015-08-06T02:57:19+5:302015-08-06T02:57:19+5:30
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत सध्या पावसाळ्यातील धुक्याचा आधार घेत वातावरणात विषारी वायू सोडून सबंध परिसर कारखानदारांकडून प्रदूषित केला जात आहे

वायुप्रदूषणामुळे कोंडतोय श्वास
धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत सध्या पावसाळ्यातील धुक्याचा आधार घेत वातावरणात विषारी वायू सोडून सबंध परिसर कारखानदारांकडून प्रदूषित केला जात आहे. या ठिकाणी वायूप्रदूषणाचा कहर झाल्यामुळे अनेकांना या वायूप्रदूषणाची बाधा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रासायनिक कारखान्यांतून दिवस-रात्र वायूप्रदूषण होत असल्याने ग्रामस्थांसह नजीकच्या परिसराबरोबर नाक्यावरील व्यावसायिकांचे जीवही मेटाकुटीला आले आहे. कारखानदारांकडून सततच्या होत असलेल्या वायुप्रदूषणाचा महाप्रताप मात्र अनेकांच्या जीवावर बेतत आहे. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारीवर्गाला याबाबत कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक नसून याकडे कानाडोळा असल्याचे दिसते. मात्र सततच्या वायुप्रदूषणाला कंटाळलेल्या या परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रदूषित कंपन्यांवरील कठोर कारवाईबाबत आक्रमक भूमिका घेणार आहेत.
धाटाव औद्योगिक वसाहतीत रा.जि.प. केंद्रीय शाळा, पोस्ट, कार्यालय, बँका, क्रीडा संकुल त्याचप्रमाणे इतर शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी शाळेत गावागावातून शालेय विद्यार्थी तर शिक्षकवर्ग येतात. त्याचप्रमाणे विविध कारखान्यात रोजीरोटीसाठी खेडोपाड्यातून कामगारवर्ग येत असतो.
धाटावमध्ये बहुतेक कंपन्या दिवसरात्र पावसाच्या धुक्याचा आधार घेत वातावरणात राजरोसपणे दुर्मीळ वायू वातावरणात सोडत असतात. याचा त्रास होत असल्याने येथील नागरिक संतप्त आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना तर चक्क दरवाजे बंद करून व नाक दाबून शिक्षण घ्यावे लागत आहे. तर धाटाववासीयांची अवस्था तर रोज मरे त्याला कोण रडे? अशी होवून बसली आहे. सततच्या पांढऱ्या रंगाच्या ठसका लागणाऱ्या वायुप्रदूषणामुळे धाटावमध्ये जणू दिवसरात्र धुर दिसत आहे.
या प्रदूषणाचा त्रास शालेय विद्यार्थी, कामगार वर्ग, शिक्षक, क्रीडा संकुलात येणारे खेळाडू, त्याचप्रमाणे रोहा कोलाड रस्त्यालगत असणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांबरोबर नजीकच्या लोकवस्तीला होत असल्याने जणू जीव गुदमरून जात असल्याने काहीजण सांगतात.
प्राणघातक विषारी वायूच्या दुर्गंधीने दमा, खोकला, छातीत दुखणे, डोळे चुरचुरणे यासह फुप्फुसाच्या तत्सम आजारांना बळी पडावे लागत आहे. प्रदूषणामुळे या परिसरातील कामगारवर्गाला मोठमोठे आजार उद्भवू लागले आहेत. सुरू असलेल्या या वायुप्रदूषणाबाबत स्थानिक पातळीवरील पर्यावरणप्रेमी संघटनांनी संबंधितांना निवेदन दिले असून यावर लवकरात लवकर योग्य उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)