सर्व्हिस रोडच्या कामाचा फटका कळंबोलीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:58 IST2018-07-25T02:57:28+5:302018-07-25T02:58:15+5:30
पाण्याचा निचरा होण्यास अडथळा; कामोठेतील काम तीन वर्षांपासून अपूर्णच

सर्व्हिस रोडच्या कामाचा फटका कळंबोलीला
कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर कामोठे बाजूकडील सर्व्हिस रोडचे काम तीन वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे, त्यामुळे कामोठेकरांची गैरसोय दूर होणार असली, तरी त्याचा फटका मात्र कळंबोली वसाहतीला बसू लागला आहे. या कामामुळे या वसाहतीत पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहे.
कळंबोली तीन मीटर खाली असल्याने कमी पावसातही पाणी साचते. त्याचबरोबर जास्त पाऊस झाल्यानंतर रहदारीला अडथळा निर्माण होतो. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर सिडकोने पावसाळी नाल्याची निर्मिती केली. सिंग सिटी रुग्णालयाजवळ जलधारण तलाव तयार करण्यात आला. याशिवाय पाण्याचा उपसा करण्याकरिता पंपिंग सोयही सिडकोने केली आहे. यंदा सिडकोने नालेसफाई चांगल्या पद्धतीने केली होती.
तसेच पाणी साचणार नाही, याकरिता बऱ्यापैकी उपाययोजना केल्या होत्या. तरीही रस्त्यावर दोन ते अडीच फूट तर काही ठिकाणी तीन फूट पाणी साचले होते, त्यामुळे कळंबोलीकरांच्या रोषाला सिडकोला सामोरे जावे लागले. मात्र, या गोष्टीला कामोठे येथील लेफ्ट टर्नचे काम कारणीभूत असल्याचा मुद्दा ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम कदम यांनी सर्व यंत्रणाच्या लक्षात आणून दिला. त्यानुसार सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी पाहणी
केली.
कळंबोली जलधारण तलावात खाडीला जाणारा प्रवाह या कामामुळे अडला गेला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बॅक वॉटर कळंबोलीत जात होते.
याबाबत सिडकोने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या संदर्भात सा. बां. विभागाचे उपअभियंता एस. व्ही. अलगुर यांच्याशी संपर्क साधला असता, पाहणी करून याबाबत
उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.
यंदा सिडकोने चांगल्या प्रकारे नालेसफाई केली होती. मात्र, तरीही पावसाचे पाणी साचत होते. मात्र, याला कारणीभूत सार्वजनिक बांधकाम विभाग असल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिले, त्यानुसार कळंबोलीकरांच्या वतीने आम्ही या विभागाच्या अधिकाºयांना जाब विचारला आहे.
- आत्माराम कदम, ज्येष्ठ शिवसैनिक, कळंबोली
पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, याकरिता सर्व त्या उपाययोजना आम्ही केल्या आहेत. मात्र, कामोठे लेफ्ट टर्नच्या कामाच्या ठिकाणी पाणी अडत असल्याने मध्यंतरी काही प्रमाणात वसाहतीत पाणी साचले होते, त्यानुसार आमच्या कार्यालयाने सा. बां. विभागाला कळविले आहे.
- गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता,
सिडको, कळंबोली नोड