इंटरनेट सेवेअभावी पोस्टाचे व्यवहार ठप्प
By Admin | Updated: July 10, 2016 00:31 IST2016-07-10T00:31:30+5:302016-07-10T00:31:30+5:30
मुरु ड पोस्टाची इंटरनेट सेवा बंद पडल्याने गेल्या १५ दिवसांपासून मुरु ड तालुक्यातील पोस्ट कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना

इंटरनेट सेवेअभावी पोस्टाचे व्यवहार ठप्प
मुरु ड/नांदगाव : मुरु ड पोस्टाची इंटरनेट सेवा बंद पडल्याने गेल्या १५ दिवसांपासून मुरु ड तालुक्यातील पोस्ट कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून, नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बीएसएनएल अथवा रायगड जिल्हा पोस्ट कार्यालयाकडून अद्याप या समस्येवर कोणतीच उपाययोजना न झाल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. १५ दिवसांपासून पोस्ट कार्यालयात कोणतेही व्यवहार झालेले नाहीत. त्यामुळे फिक्स डिपॉजिट पूर्ण झालेल्यांना आपले पैसे काढता आले नाहीत, तर काहींना गरज असूनही पैसे उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
मुरुड तालुक्यातील पोस्ट कार्यालयांतर्गत आगरदांडा, काशीद, माजगाव, नांदगाव, राजपुरी, सावली, शिंगरे, उसरोळी, विहूर अशा नऊ शाखा पोस्ट कार्यालयांतर्गत हीच परिस्थिती आहे. २२ जूनपासून पोस्टाची नेट सेवा बंद पडल्याने मनीआॅर्डर, पार्सल, रजिस्टर एडी, रिकरिंग बचत खाते, अल्प बचत खाते, मासिक व्याज, पेन्शन व अन्य महत्त्वाच्या बाबी बंद आहेत. ग्रामीण भागातून लोक पैसे टाकण्यासाठी अथवा काढण्यासाठी पोस्टात येतात, मात्र त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. पोस्टाच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयाने या गलथान कारभाराची दखल घ्यावी व हा प्रश्न लवकर निकाली काढावा, अशी मागणी सर्व ग्राहकवर्ग करीत आहे. (वार्ताहर)