जेएनपीए-मुंबई प्रवास आता ३५ ते ४० मिनिटांत होणार शक्य; प्रदूषणविरहित अत्याधुनिक दोन स्पीड बोटी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:17 IST2025-03-19T14:16:33+5:302025-03-19T14:17:47+5:30
प्रवासीसंख्या कमी झाल्याने व लाकडी बोटी या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नसल्याचे निदर्शनास आल्याने जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी- सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीड बोटींचा पर्याय निवडला आहे.

जेएनपीए-मुंबई प्रवास आता ३५ ते ४० मिनिटांत होणार शक्य; प्रदूषणविरहित अत्याधुनिक दोन स्पीड बोटी सज्ज
उरण : जेएनपीएच्या गेट-वेपर्यंतची सागरी प्रवासी स्पीड बोटींची शुक्रवारी ट्रायल घेण्यात येणार आहे. ती यशस्वी झाल्यानंतर लागलीच प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला जाणार आहे. या प्रदूषणविरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना जेएनपीए-मुंबई हा प्रवास अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत करता येणे शक्य होणार आहे.
प्रवासीसंख्या कमी झाल्याने व लाकडी बोटी या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नसल्याचे निदर्शनास आल्याने जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी- सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीड बोटींचा पर्याय निवडला आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने काही महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. यासाठी इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या प्रदूषणविरहित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या दोन फायबरच्या हलक्या स्पीड बोटी १० वर्षांच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
३७ कोटी ८९ लाखांची तरतूद
माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला बोटीपुरवठा व हाताळणीचे काम दिले आहे. १० वर्षांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या स्पीड बोट सेवेसाठी जेएनपीएने ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० रुपये खर्चाची तरतूदही केली आहे.
उन्हाळी हंगामात २०-२५ प्रवासी व पावसाळी हंगामात १०-१२ क्षमतेच्या दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेल्या दोन स्पीड बोटी गेल्या फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच वाहतुकीसाठी जेएनपीटीच्या सेवेत दाखल होणार होत्या.
मात्र, तांत्रिक कारणांमुळे स्पीड बोट सेवा सुरू करण्यात विलंब झाला आहे. आता शुक्रवारी त्यांची ट्रायल घेण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीएचे उपसंरक्षक कॅ. बाळासाहेब पवार यांनी दिली.
यांना होणार बोटींचा फायदा
सागरी स्पीड बोट सेवा बंदरात कामकाजासाठी मुंबईतून ये- जा करणाऱ्या जेएनपीएचे कामगार, प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ आणि फॅमिली मेंबर्स, पोर्ट युजर्स आदी कामगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे वेळही वाचण्यास मदत होणार आहे.