जंजिरा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 23:25 IST2020-11-15T23:25:30+5:302020-11-15T23:25:58+5:30
पर्यटक नाराज : कार्यालय बंद असल्याने बोटी, यांत्रिकी नौका यांचे परवाने नूतनीकरण रखडले

जंजिरा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बंद
संजय करडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा मार्च महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या भागातील स्वयंरोजगार बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी पुरातन वास्तू पर्यटकांसाठी खुल्या केल्या, परंतु सध्या दीपावलीची सुट्टी असल्याने कार्यालये बंद असल्याचा फटका बोटधारकांना सहन करावा लागत आहे. कार्यालय बंद असल्याने १३ शिडाच्या बोटी व दोन यांत्रिकी नौका यांचे परवाने नूतनीकरण न झाल्याने व प्रवासी विम्याची कार्यवाही न केल्यामुळे अजूनपर्यंत जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी किल्ला खुला करूनही महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाची कार्यवाही पूर्ण न झाल्याने सध्या किल्ला बंद असून, पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. दिवाळी सुट्टी असल्याने महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत, परंतु वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पर्यटक नाराज होऊन परतत आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी बुधवार, १८ नोव्हेंबर रोजीपर्यंत पूर्ण झाल्यावरच या किल्ल्यातील जलवाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे, परंतु सध्या सुट्ट्या असल्याने शेकडोच्या संख्येने पर्यटक आपल्या वाहनाने जंजिरा किल्ला परिसरात येऊन जल वाहतूक बंद असल्याने नाराज होऊन परतत आहेत. पुरातत्त्व खात्यांच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने आम्हाला आद्यापपर्यंत किल्ल्यावरील जल वाहतूक सुरू करणार आहोत, असे लेखी कळविले नाही. त्यामुळे आम्हाला किल्ल्यातील स्वच्छता, तसेच ऑनलाइन तिकीट व्यवस्था करण्याची अंमलबजावणीही करता आलेली नाही. मेरिटाइम बोर्ड आम्हाला ज्यावेळी कळवेल, त्यावेळी आम्ही काम तातडीने सुरू करणार आहोत.
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे राजपुरी आगरदांडा विभागाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणाऱ्या १३ शिडाच्या बोटी व दोन यांत्रिक बोटींचे नूतनीकरण झालेले नाही, शिवाय प्रवासी विमाही काढलेला नाही असे सांगितले.
बोटींचे परवाने नूतनीकरण करण्यासाठी मेरिटाइम बोर्डाकडे दीड महिन्यांपूर्वीच प्रकरणे सादर केली आहेत. प्रवासी विमा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून किल्ला बंद आहे. या भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी किल्ला खुला केला आहे. जल वाहतुकीच्या प्रक्रिया आपण लवकरच पूर्ण करू, परंतु जलवाहतूक सुरू करा.
-जावेद कारभारी, चेअरमन,
वेल कम जल वाहतूक सोसायटी