भूमिपूजनास दहा वर्षे झाली, तरी वीट लागेना; नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:57 PM2019-12-08T23:57:49+5:302019-12-08T23:58:08+5:30

सुधागडातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाढत्या लोकसंख्येनुसार शासनाने २००८ मध्ये ३० लाखांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.

It has been ten years since Bhoomi Puja, however, did not bother; Citizens Angry | भूमिपूजनास दहा वर्षे झाली, तरी वीट लागेना; नागरिक संतप्त

भूमिपूजनास दहा वर्षे झाली, तरी वीट लागेना; नागरिक संतप्त

Next

- विनोद भोईर 

पाली : सुधागडातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाढत्या लोकसंख्येनुसार शासनाने २००८ मध्ये ३० लाखांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २००८ पासून २०१८ पर्यंतच्या कालावधीत तीन वेळा नारळ फोडण्याचा समारंभही उरकून घेण्यात आला. अखेर आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी भूमिपूजन केले असता त्या प्रसंगी आमदार धैर्यशील पाटील यांनी डॉक्टर सावंत यांना या ग्रामीण रुग्णालयाचे तिसऱ्यांदा भूमिपूजन होत आहे. मात्र, ही वास्तू तुमच्या कारकिर्दीत पूर्ण होईल का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर डॉक्टर सावंत यांनी बल्लाळेश्वर पावन भूमीतील या वास्तूचे काम पूर्ण करण्याची संधी मला दिली आहे. ते मी पूर्ण करणार, असा विश्वास दिला होता. मात्र, त्यांनीही याकडे आजवर लक्ष दिले नाही.

शासनाने निर्णय घेऊन तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली तरी ग्रामीण रुग्णालय झाले नसल्याने सुधागडातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या ग्रामीण रुग्णालयाचे तीन वेळा भूमिपूजन केले तरी आजवर वीट लागली नाही. तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत गरज आहे; कारण औद्योगिकीकरण हे मोठ्या प्रमाणात झाले असून, त्यांच्या तुलनेत हे प्राथमिक आरोग्य केंद्र कुचकामी ठरत आहे.

आरोग्य केंद्राची झाली दयनीय अवस्था

१सध्या या केंद्राची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शासन नियमाप्रमाणे पूर्ण वेळ दोन डॉक्टर अपेक्षित असताना एकच डॉक्टर कार्यरत आहे. आॅपरेशन थिएटर पूर्णपणे मोडकळीस आले आहे. आता त्याची अवस्था गोडाऊनसारखी झाली आहे.

२पावसाळ्यात ही इमारत जागोजागी गळत असते, कधीतरी रंगरंगोटी करून इमारत देखणी झाल्याचा आभास निर्माण केला जातो. कर्मचाऱ्यांना ही इमारत गैरसोयींची वाटू लागली आहे.

सुधागड तालुका हा आदिवासी तालुका आहे. येथे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात नाही. येथे मोलमजुरी करूनच लोक आपला उदरनिर्वाह करतात. येथील जिल्हा परिषद दवाखान्यात नेहमीच औषधांचा तुटवडा भासतो. मोठा आजार असल्यास किंवा अपघात झाल्यास मुंबई येथे रुग्णास हलवावे लागते. ही खर्चिक बाब असून ती न परवडणारी आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे.
- रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते.

पाली ग्रामीण रुग्णालयाचे २२ कोटी ४९ लाख १६ हजार ७०० रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळून निधी प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात होईल.
- डॉ. अजित गवळी, जिल्हा सहायक चिकित्सक

Web Title: It has been ten years since Bhoomi Puja, however, did not bother; Citizens Angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड