ISO rating to Shivakar Gram Panchayat, the first Gram Panchayat in Panvel | शिवकर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन, पनवेलमधील पहिली ग्रामपंचायत

शिवकर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन, पनवेलमधील पहिली ग्रामपंचायत

वैभव गायकर
पनवेल - शिवकर ग्रामपंचायतीला इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशनचे (आयएसओ) मानांकन मिळाले आहे. आयएसओ मानांकन मिळालेली पनवेल तालुक्यातील ही पहिली ग्रामपंचायत असून, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शिवकर ग्रामपंचायतीने आपली नवीन ओळख निर्माण केली.
सुमारे २५०० ते ३००० दरम्यान लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत दहा ग्रामसदस्य आहेत. यामध्ये सरपंच म्हणून अनिल ढवळे काम पाहत आहेत. ढवळे यांच्या संकल्पनेनुसार विविध उपक्रम ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात आले आहेत. यामध्ये गावाच्या सुरक्षिततेसाठी प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. शेतीतून जास्त नफा मिळावा, याकरिता चंदनशेतीचा उपक्रम ढवळे यांनी राबविला. आयएसओ मानांकनासाठी विविध निकष असतात. यामध्ये ग्रामपंचायतीच्या ३३ नमुन्यासह एकूण ५१ निकषांचा समावेश असतो. यामध्ये ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प, जन्म-मृत्यू नोंदणी, घरपट्टी वसुली, स्वच्छता, कर्मचारी नेमणूक, मागील तीन वर्षांच्या कर्मचाऱ्यांचे आॅडिट, घनकचरा व्यवस्थापन, विविध उपक्रम आदीसह अनेक निकषांचा समावेश असतो. शिवकर ग्रामपंचायतीने यापूर्वीच डिजिटल ग्रामपंचायतीचा मान मिळविला आहे. गावात दवंडी पिटविण्याच्या संकल्पनेला आधुनिक स्वरूप देत महत्त्वाच्या ठिकाणी साउंड सिस्टीम उभारून ग्रामपंचायत कार्यालयातूनच दवंडी दिली जाते. ग्रामपंचायतीमधील रहिवाशांसाठी एक सूचनापेटी ठेवण्यात आली आहे. शिवकर ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ २६१ हेक्टर आहे. यापैकी १६८ हेक्टर जागेवर शेती केली जाते. याकरिताही ग्रामपंचायत काही शेतकऱ्यांना खर्च देते. शासनाकडून भाताला प्रतिक्विंटल १,७५० एवढा भाव दिला जातो. शिवकर ग्रामपंचायत याच भाताला प्रतिक्विंटल २००० एवढा भाव देते.

शिवकर ग्रामपंचायत संपूर्ण राज्यातील अव्वल बनविण्याचा मानस आहे. याकरिता आम्ही विविध नावीन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत हद्दीत राबविले आहेत. येत्या १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, आमची जबाबदारी वाढली आहे. भविष्यात विकासकामांवर आणखी भर देणार आहोत.
- अनिल ढवळे, सरपंच, शिवकर

Web Title: ISO rating to Shivakar Gram Panchayat, the first Gram Panchayat in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.