महाडमध्ये इंटरनेट सेवेचा बोजवारा, बीएसएनएलची सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:14 AM2018-12-25T03:14:23+5:302018-12-25T03:14:50+5:30

महाड शहर आणि ग्रामीण भागात महामार्ग रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने सर्वच कंपन्यांच्या इंटरनेट सुविधांचा बोजवारा उडाला आहे.

Internet service stop in Mahad, BSNL service jam | महाडमध्ये इंटरनेट सेवेचा बोजवारा, बीएसएनएलची सेवा ठप्प

महाडमध्ये इंटरनेट सेवेचा बोजवारा, बीएसएनएलची सेवा ठप्प

Next

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड शहर आणि ग्रामीण भागात महामार्ग रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने सर्वच कंपन्यांच्या इंटरनेट सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सततच्या खंडित होणाऱ्या सेवांमुळे ग्राहकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. यात सर्वाधिक फटका बीएसएनएलच्या ग्राहकांना बसत असून दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. पोस्ट आॅफिस, बँक, सरकारी कार्यालये त्याचबरोबर अन्य दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.

महाड आणि परिसरात गेले वर्षभर इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडाला आहे. घराघरात मोबाइल असल्याने इंटरनेटचा वापर वाढला आहे. शिवाय शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, आणि व्यावसायिक-उद्योजक इंटरनेट सुविधेचे ग्राहक आहेत. देशात सर्वच बाबतीत आॅनलाइन कामावर भर दिला जात आहे. त्यामुळे विविध प्रकल्पात खासगी आणि शासकीय कंपन्यांच्या इंटरनेटचे जाळे जोडले जात आहे.

वर्षभरापासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात सातत्याने भारत संचार निगम लिमिटेडच्या केबल्स अनेकदा तोडल्या गेल्या आहेत. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या केबलचीही अवस्था थोडीफार अशीच आहे. महाड शहरात सुमारे २५० पेक्षा अधिक टेलिफोनचे कनेक्शन विविध सामाजिक संस्था, व्यापारी, बँका, एसटी महामंडळ यांना देण्यात आले.

गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये टेलिफोनच्या सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक लँडलाइन फोन सेवा बंद झाली आहे. असंख्य ग्राहकांनी बीएसएनएल टेलिफोन सेवा बंद करून खासगी सेवा वापरणे पसंत केले आहे. त्यातच जे बीएसएनएलचे इंटरनेट वापरत आहेत, त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. महिन्याचे बिल वेळेवर येत असले तरी सुविधांबाबत वानवाच आहे.

केंद्र शासनाने सर्व व्यवहार इंटरनेटच्या मदतीने करण्याचे आवाहन करताना अनेक क्षेत्रांमध्ये सक्ती देखील केली आहे. इंटरनेट ग्राहकांवर सक्ती करताना सर्व प्रथम ही सेवा नियमित व अखंडित पुरविणे कंपनीची जबाबदारी आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून महाड शहरातील इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने बँका तसेच सरकारी कामकाजावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले असून ऐनवेळी इंटरनेट सेवा बंद होत असल्याने बँॅकेतून रक्कम मिळणे देखील अशक्य झाले आहे.

इंटरनेटवर चालणारी एटीएम यंत्रणा ग्रामीण भागांमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक गावांत एटीएम यंत्रणा महिन्यातून काही दिवस सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. महाड तालुक्यातील निवृत्त कर्मचाºयांची पेन्शन बँकेत जमा होत असल्याने आपल्या पेन्शनसाठी ग्रामीण भागातून येणाºया लोकांना देखील नेटअभावी वाºया कराव्या लागत आहेत. वारंवार खंडित होणाºया केबल्सप्रकरणी बीएसएनएलकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. महाड शहरासह ग्रामीण भागांमध्ये बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा वापर करणारे पाच हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. दरमहिन्याल्या बिल वेळात येते, मात्र सेवेचा बोजवाजा उडालेला आहे. याविरोधात स्थानिक ग्राहक मंचाकडे तक्र ार करण्याच्या विचारात आहेत.

पोस्टामध्ये बीएसएनएलची इंटरनेट सुविधा सातत्याने खंडित होत आहे. याचा टपाल खात्याच्या विविध सेवांवर परिणाम होत आहे. पोस्टाची बँकिंग सुविधा, रेल्वे काऊंटर यामुळे बंद ठेवावे लागतात. त्यामुळे पोस्टातील ग्राहकांच्या संतापाला सामोरे जावे लागते.
- भारती शेठ, पोस्ट मास्तर, महाड

बीएसएनएलची नेट सुविधा बंद पडल्यानंतर ग्राहकांची गैरसोय होते. बँकेत व्ही. सॅट नेट सुविधा सुरू असली तरी त्याचे नेटवर्क धीम्या गतीने सुरू असते. बीएसएनएल नेटवर्क बंद पडल्यानंतर पासबुक अपडेट, डिपॉझिट रिसीट देताना अडचणी येतात. ग्राहकांना सुविधा देता येत नाही. परिणामी त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
- प्रदीप कोटापूरम, व्यवस्थापक,
आयसीआयसी बँक,महाड

Web Title: Internet service stop in Mahad, BSNL service jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.