अभियंत्यांसाठी प्रेरणादायी दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:34 IST2019-09-15T00:34:33+5:302019-09-15T00:34:36+5:30
सर मोक्षगुंडम विश्वेसरय्या यांचा जन्मदिवस; अभियंता दिनी कार्याला उजाळा

अभियंत्यांसाठी प्रेरणादायी दिवस
भारतातील सर्वच उद्योग, मोटार आॅटोमोबाईल, धरणे, रस्ते, पाटबंधारे, जलविद्युत प्रकल्प, औष्णिक वीज प्रकल्पात काम. अभियंता क्षेत्रात व त्या फिल्डवर काम करणाऱ्या तमाम भारतीय अभियंत्यांचे प्रेरणा व स्फूर्ती देणारे थोर व महनीय व्यक्तिमत्त्व म्हणून भारतरत्न, सर मोक्षगुंडम विश्वेसरय्या यांचा दीपस्तंभाप्रमाणे आधार व मार्गदर्शन त्यांच्या जीवन कार्यातून मिळते. १५ सप्टेंबर १८६१ हा त्यांचा जन्मदिवस भारत सरकार व संबंधित राज्य सरकारे ‘अभियंता दिन’ म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून अभियंत्यांना प्रत्येक विभागातील त्यांनी केलेल्या विशिष्ट कामगिरीचे मूल्यांकन करून ‘सर’ विश्वेसरय्या या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे आणि अभियंता क्षेत्रातील देशातील हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.
गुणवंत व विविध नवनवीन संकल्पनांचा आधार घेत इंजिनीअरिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणे हीसुद्धा राष्ट्राच्या उन्नतीसाठी मोठी प्रयोगशील भूमिका असते. तेच करून देशातील मोठमोठे प्रकल्प व त्यातील स्थापत्यकलांचा आविष्कार घडवून देशाच्या प्रगतीला हातभार लावणे हा मूळ हेतूच ‘अभियंता दिन’ साजरा करण्यासाठी अभिप्रेत आहे. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म मुळीच प्रतिभासंपन्न घराण्यात झाला.
विद्येची देवता सरस्वतीचे वरदान उपजत त्यांच्या कुटुंबाला लाभले असल्याने असा प्रतिभासंपन्न दूरदूष्टीने विकासाची संकल्पना राबविणारा कुशल अभियंता लाभला. लक्ष्मीची अवकृपा व सरस्वतीचे अधिष्ठान यामुळे याच विद्यादात्रीने त्यांच्या कर्तृत्त्वाचा जागर समाज व राष्ट्रात घडविला. त्यांची हुशारी व प्रतिभा पाहूनच म्हैसूरच्या राजाने विद्वानांना सन्मान देत अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी अभियंता पदवी प्राप्त केली. ती प्रथमश्रेणीत व सर्वांच्या पुढे नंबर वनने त्या कालखंडातील प्राच्य शिक्षणाचा विचार केल्यास शिक्षणासाठी काय कष्ट उपसावे लागत होते यांची जाणीव होते. त्यांनी अभियांत्रिकी परीक्षेत मिळविलेले देदीप्यमान यश पाहून सरकारने लगेचच १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता पदावर थेट नेमणूक केली. या कार्यात त्यांनी आपल्या हुशारी व कर्तृत्त्वाचा वसा उमटविला.
नोकरीत असताना त्यांनी खडकवासला धरणासाठी एक अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिती करून त्यामुळे त्यातले कौशल्य अभियांत्रिकीचा आविष्कार पहावयास मिळाला.
धरणाच्या पाणी पातळीवरील अतिरिक्त पातळीवरचे पाणी या गेटमधून वाहून जाते. हे गेट भारतात प्रथमच तयार झाले आणि या गेटचे नावच विश्वेसरय्या गेट झाले. १९0७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली. त्यावेळी अशा नोकरीवर एखादा सन्मानाने जगला असता. परंतु साक्षात सरस्वतीचे वरदानच त्यांना प्राप्त असल्याने त्यांच्या हातून काहीतरी भव्यदिव्य करण्याची ईश्वराची इच्छा असावी. त्यांची कीर्ती पाहून निजामांनी त्यांना संस्थानात सरकारचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्त केले.
हैद्राबादेत त्यांनी दोन नद्यांवर धरणे बांधून शहर पूरमुक्त केले. शहराचा कायापालट झाला. यानंतर म्हैसूर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची आॅफर दिली. ती त्यांनी स्वीकारून या काळात कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे करून आपले योगदान दिले. त्यानंतर त्यांच्या कीर्तीचा आलेख वाढतच गेला.
धरणे, उद्योग, जलसिंचन या क्षेत्रात पाण्याचा अपव्यय टाळून त्यांनी देशाच्या पंचवार्षिक योजनांमध्ये जी धरणांच्या निर्मितीत अभूतपूर्व कामगिरी केली ती सर्वोत्तम ठरली. भारत सरकारने ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पदाने त्यांचा गौरव केला.
आज नैसर्गिक आपत्तीचे संकटाचा सामना देशातील राज्यांना करावा लागतो. विकासाच्या संकल्पनेत नद्यांचे प्रवाह व त्यांचा मूळ मार्ग बदलल्याने शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते.
पूर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना, विजेचा पुरवठा व संयंत्राचे योग्य व्यवस्थापन, रस्ते बांधणीत योग्य प्रकारची गुणवत्ता राखणे, धरणाच्या निर्मितीत बळकटीकरणाचे बंधारे या गोष्टी आजच्या अभियंत्यांनी एकमेकांच्या सहकार्यातून करून त्या संकल्पना राबविणे गरजेचे आहे. सर सर्वगुंडम विश्वेसरय्या यांच्या नावाचा पुरस्कार घेताना या महान विश्वकर्मा निर्मित अभियंत्याच्या नावाने दिलेला पुरस्कार मोठा आहेच व त्याचे मोलही श्रेष्ठ आहे.