Indian Railways ready for oxygen transport | ऑक्सिजन वाहतुकीसाठी भारतीय रेल्वे सज्ज

ऑक्सिजन वाहतुकीसाठी भारतीय रेल्वे सज्ज


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/  कळंबोली : काेरोना रुग्णसंख्या वाढत असून, उपचारासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी वाढत आहे. दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीसाठी रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेस चालविणार आहे. काेराेनाग्रस्तांवरील उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे.
रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून ही वाहतूक अधिक वेगवान हाेऊ शकते. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने ऑक्सिजनची वाहतूक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का, याची चाचपणी केली. त्यानुसार आता फ्लॅट वॅगन्सवर ऑक्सिजन टँकर ठेवून रोरो वाहतूक करण्यात येणार आहे. 
या राे राेसाठी विशिष्ट उंचीचे टँकर राज्याच्या परिवहन विभागाकडून पुरविण्यात येणार आहेत. माेकळे टँकर कळंबाेळी आणि बाेईसर रेल्वे स्थानकातून वॅगन्सवर चढविण्यात येतील.
ऑक्सिजन साठा टँकरमध्ये भरुन आणण्यासाठी विजाग, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथे पाठविले जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्थानकात यासाठी गेल्या दोन दिवसापासून ट्रॅक बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर टँकर चढवण्यासाठी मातीचा भराव करत ट्रॅक उंचीचा रॅम्प तयार करण्यात आला आहे . १५ टन रिकामे असलेले टँकर कळंबोली येथून विशाखापट्टणमसाठी सोमवारी रवाना होणार आहेत.

ऑक्सिजन टँकर चढ उतारासाठी विशेष ट्रॅक
विशाखापट्टणम येथे रेल्वेमार्फत राज्य सरकारकडून पुरवण्यात आलेले टँकर नेण्यासाठी कळंबोली रेल्वे स्थानकावर सलग ४८ तास काम सुरु ठेवून प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी १६ टन क्षमतेचे १५ टँकर विशेष ट्रेनवर चढवण्यात येणार आहेत. ट्रेनवर ३२ टँकर जाऊ शकतात . सध्या तरी १५ टँकरचे नियोजन करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टॅंकर्सची विशिष्ट रचना
काही ठिकाणी रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलांची उंची, ओव्हरहेड वायर इत्यादींचा विचार करुन ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टॅंकरची रचना करण्यात आली आहे. या टॅंकरची उंची ३३२० मिमि आहे. ते १२९० मिमि उंची असलेल्या सपाट वॅगन्सवर ठेवण्यात आले आहेत. त्यांची वाहतूक सुरळीत व्हावी, यादृष्टीने विविध ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या हाेत्या. बाेईसर येथेदेखील चाचणी घेण्यात आली.
 

Web Title: Indian Railways ready for oxygen transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.