अलकार्गो, स्पीडी वेअर हाऊसवर आयकर विभागाची धाड; कंटेनर यार्ड, कंपन्यांचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:39 IST2025-02-12T06:39:00+5:302025-02-12T06:39:24+5:30

सोमवारी सकाळी ११ वाजता आयकर विभागाने सुरू केलेली कारवाई मंगळवारी रात्रीपर्यंत अद्यापही सुरूच होती.

Income Tax Department raids Alcargo, Speedy Warehouse; Container yard, companies face scare | अलकार्गो, स्पीडी वेअर हाऊसवर आयकर विभागाची धाड; कंटेनर यार्ड, कंपन्यांचे धाबे दणाणले

अलकार्गो, स्पीडी वेअर हाऊसवर आयकर विभागाची धाड; कंटेनर यार्ड, कंपन्यांचे धाबे दणाणले

उरण - उरण परिसरातील अलकार्गो व स्पीडी वेअर हाऊस या दोन कंटेनर यार्डवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. या दोन्ही यार्डवर सोमवारपासून सुरू केलेली कारवाई मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. आयकर विभागाच्या धाडीनंतर परिसरातील बहुतांश कंटेनर यार्ड, कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

उरण परिसरात कोप्रोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत अलकार्गो कंटेनर यार्ड आहे, तर अलकार्गो व्यवस्थापनाच्या अखत्यारितील सोनारी ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्पीडी मल्टिमोड लिमिटेड कंटेनर वेअरहाऊस आहे. दोन्ही कंपन्या एकाच व्यवस्थापनाच्या मालकीच्या आहेत. या दोन्ही कंटेनर यार्डवर, वेअरहाऊसवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी एकाचवेळी धाड टाकली. सोमवारी सकाळी ११ वाजता आयकर विभागाने सुरू केलेली कारवाई मंगळवारी रात्रीपर्यंत अद्यापही सुरूच होती.

कर्मचारी नजरकैदेत
कारवाईदरम्यान कंपनीच्या एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना आयकर विभागाने बाहेर जाऊ न देता नजरकैदेत ठेवले आहे. महिला कर्मचाऱ्यांना रात्री उशिरा कंपनीतून सोडण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांपासून मोबाइल फोन आयकर विभागाने जप्त करून ठेवलेले आहेत.

इतर कार्यालयांवर छापे
आतील कामगारांना कंपनीबाहेर, तर बाहेरील कामगारांना कंपनीत जाण्यास बंदी घातली. यामुळे कारवाईदरम्यान नेमके काय सुरू आहे, याचा थांगपत्ता कोणालाही लागला नसल्याचे दोन्ही कंपन्यांच्या कामगारांना सांगितले जात आहे. अलकार्गो कंपनीच्या इतर विभागांतील व संपर्कातील कार्यालयांवरही छापे मारून कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची दोन दिवसांपासून कसून तपासणी करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. याप्रकरणी कारवाई संपुष्टात आल्यानंतर माहिती देणे उचित ठरेल, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.  आयकर विभागाच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Web Title: Income Tax Department raids Alcargo, Speedy Warehouse; Container yard, companies face scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.