न्यायालयाच्या इमारतीचे आज उद्घाटन
By Admin | Updated: May 10, 2017 00:24 IST2017-05-10T00:24:09+5:302017-05-10T00:24:09+5:30
वाशी न्यायालयाची हक्काची इमारत बांधून पूर्ण झाली असून बुधवारी त्याचे उद्घाटन होणार आहे. सीबीडी सेक्टर १५ येथे उभारलेल्या

न्यायालयाच्या इमारतीचे आज उद्घाटन
सूर्यकांत वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वाशी न्यायालयाची हक्काची इमारत बांधून पूर्ण झाली असून बुधवारी त्याचे उद्घाटन होणार आहे. सीबीडी सेक्टर १५ येथे उभारलेल्या या इमारतीमध्ये २१ खंडपीठांचे कामकाज चालणार असून २० न्यायाधीशांच्या निवासाची सोय त्यामध्ये करण्यात आली आहे. १९९७ मध्ये न्यायालयाच्या स्थापनेपासून स्वत:च्या इमारतीसाठी वकिलांच्या सुरु असलेल्या लढ्याला अखेर २० वर्षांनी यश आले आहे.
२९ हजार ४८० चौ.मी. क्षेत्रफळाच्या एकूण सहा भूखंडावर ही इमारत उभारण्यात आली आहे. त्याकरिता सुमारे ५४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. न्यायालयाची ही इमारत उभी राहावी यासाठी वकिलांच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एच. बी. पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न चालवले होते. याकरिता अॅड. पाटील यांना २००८ सालापासून मंत्रालयात शेकडो फेऱ्या माराव्या लागल्या. दरम्यानच्या काळात मंत्रालयात सकारात्मक बैठक देखील झाली होती. त्यामध्ये ३४ खंडपीठाची न्यायालयाची इमारत उभारणीचा निर्णय घेतला जाणार होता. मात्र एका हरकतीमुळे बैठक रद्द झाल्यानंतर पुन्हा हा प्रश्न रेंगाळला होता.
अखेर २००८ साली न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होवून २०१३ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली होती, परंतु यावेळी ३४ ऐवजी २१ खंडपीठ मंजूर करण्यात आले.
नव्या इमारतीमध्ये २१ खंडपीठाद्वारे वाशी न्यायालयाचे कामकाज सुरु झाल्यानंतर ही प्रकरणे विभागली जाऊन लवकरात लवकर खटले निकाली निघतील, असा विश्वास अॅड. एच. बी. पाटील यांनी व्यक्त केला आहे.