डिजिटल चळवळीमध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये पुस्तकाचा सुवास नक्कीच दरवळला पाहिजे!
By निखिल म्हात्रे | Updated: November 14, 2022 19:28 IST2022-11-14T19:27:38+5:302022-11-14T19:28:31+5:30
जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला विचार

डिजिटल चळवळीमध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये पुस्तकाचा सुवास नक्कीच दरवळला पाहिजे!
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: सध्या डिजिटल युग चालू आहे. मात्र या डिजिटल युगात तुम्ही जोपर्यंत पुस्तक हातात घेणार नाहीत आणि त्या पानांचा आवाज किंवा पानांचा सुवास पुस्तक वाचताना दरवळणार नाही तोपर्यंत माझ्या मते डिजिटल पुस्तकांची ओळख पुढच्या पिढीला होणार नाही. आजही दिवाळी आली की आपण दिवाळी अंक खरेदी करतो, ते आवडीने वाचतो. तरुण पिढीमध्ये या डिजिटल चळवळीमध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये पुस्तकाचा सुवास नक्कीच दरवळला पाहिजे असे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी उपस्थितांना सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 व दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी सार्वजनिक ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, अलिबाग येथे “रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2022”चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा रायगड ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पेण आणि अलिबाग तालुक्यात गरुडझेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून लवकरच ते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांकरिता खुले होईल. या अभ्यासिकेचा येथील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना निश्चितच होईल.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिका इंदुमती जोंधळे म्हणाल्या की, पुस्तके आपल्याला घडवत असतात, विचार देत असतात. पुस्तके माणूस म्हणून आपल्याला श्रीमंत करत असतात.त्यामुळे ज्या घरात पुस्तकाचे कपाट ते घर श्रीमंत आहे. माणूस म्हणून दुसऱ्याच्या मनाचा विचार आपल्याला करता आला पाहीजे. यावेळी माजी नगराध्यक्ष अलिबाग प्रशांत नाईक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्स्ना शिंदे, कोकण मराठी साहित्य परिषद, रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सुचिता पाटील, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.