रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 09:10 IST2025-11-05T09:08:16+5:302025-11-05T09:10:23+5:30
रायगड जिल्ह्यात निवडणुकीसाठी महायुतीला पोषक वातावरण, पण अंतर्गत कलहाचा फटका बसण्याची शक्यता

रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये अलिबाग, उरण, रोहा, महाड, खोपोली आणि मुरूड या महत्त्वाच्या नगरपरिषदांचा समावेश असून परिस्थिती पाहून युती, आघाडी होण्याची चिन्हे असली, तरी सर्वच राजकीय पक्षांकडून यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मुदत संपल्याने या दहाही नगर परिषदांमध्ये प्रशासक राजवट होती. त्यामुळे आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने या शहरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे तर परिस्थिती पाहून युती, आघाडीची गणिते जुळविण्यात येतील, असे येथील चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जत, पेण, उरण, माथेरान, श्रीवर्धन, रोहा, महाड, खोपोली आणि मुरूड या नगरपरिषदांमध्ये निवडणूक होणार आहे. नगरपरिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख पक्षांनी तयारी केली आहे. अद्यापर्यंत युती, आघाडी झालेली नाही. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत परिस्थिती पाहून युती, आघाडी होण्याची चिन्हे असली, तरी सर्वच राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. रायगड जिल्ह्यात निवडणुकीसाठी महायुतीला पोषक वातावरण असले तरी अंतर्गत कलहामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
या नगरपरिषदांची मुदत संपल्यापासून सत्ता प्रशासकांच्या हाती सत्ता होती. त्यामुळे अनेक विकासकामे रखडल्याचा या शहरांतील नागरिकांचा आरोप होता. नागरी सुविधांसाठी येथील नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयांवर वारंवार मोर्चे, आंदोलनेही केली होती.