मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच खरी लढत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 05:05 PM2024-03-13T17:05:45+5:302024-03-13T17:07:23+5:30

लोकसभा निवडणुकीच्या तारखाही अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत.

in maval lok sabha constituency the real fight is between india aghadi and grand alliance | मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच खरी लढत ?

मावळ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच खरी लढत ?

मधुकर ठाकूर, उरण :लोकसभा निवडणुकीच्या तारखाही अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत.मात्र मावळ लोकसभेसाठी इंडिया आघाडीतील ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर झाली आहे.मात्र विधानसभेच्या निवडणुक अद्यापही कोसो दूर असतानाही उरण विधानसभा मतदारसंघातुन त्याच दिवशी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉग्रेस,शेकाप, राष्ट्रवादी ( शरद पवार गट) आदी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीतच आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मनोहर भोईर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मतदार संघातील इच्छुक उमेदवार आणि समर्थकांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. मावळलोकसभा मतदारसंघातुन सेना -भाजप युतीचे उमेदवार तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यामध्ये गजानन बाबर एक वेळा तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत.

सेना-भाजप युतीच्या उमेदवारांनी सलग तीनही लोकसभेच्या निवडणुकीत कॉग्रेस,राष्ट्रवादी आघाडीच्या आझम पानसरे, राहुल नार्वेकर,पार्थ पवार,लक्ष्मण जगताप(शेकाप) यांचा पराभव केला.सलग तीन पराभवामुळे कॉग्रेस, शेकाप,राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला कॉग्रेस, शेकापची फारशी मदतच झाली नसल्याची ओरड आहे.

मागील पाच वर्षांत घडलेल्या विक्षिप्त, अनाकलनीय राजकीय घडामोडींमुळे राज्यात तीन मुख्यमंत्री झाले. भाजपचे देवेंद्र फडणवीस हे तर अल्पघटकेचे मुख्यमंत्री ठरले. शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा तब्बल अडीच वर्षे धूरा सांभाळला.त्यानंतर भाजपाने लावलेल्या सुरुंगाने शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांत फूट पडली.आता तर या दोन पक्षात चार गट तयार झाले आहेत.शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) दोन्ही पक्षांचे फक्त नेते,पुढारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले आहेत. मात्र किती कार्यकर्ते नेते, पुढाऱ्यांबरोबर कोणत्या गटात सामील झाले आहेत. याचा हिशेब निवडणुकीच्या निकालानंतरच पाहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखाही अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत.मात्र मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकांचाही अद्यापही थांगपत्ता नसतानाही उरण विधानसभा मतदारसंघातुन त्याच दिवशी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉग्रेस,शेकाप, राष्ट्रवादी ( शरद पवार गट) आदी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीतच आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मनोहर भोईर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.मावळ लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये उरण, पनवेल, कर्जत या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.२०१९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघातुन भाजपचे प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघातुन अपक्ष उमेदवार महेश बालदी तर कर्जत विधानसभा मतदारसंघातुन शिवसेनेचे (ठाकरे  गट) महेंद्र थोरवे निवडून आले आहेत.

उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी हे विजयी होताच भाजपाच्या डेरे दाखल झाले आहेत.तर रायगडमधुन  निवडून आलेले महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी,भरत गोगावले आदी तीनही आमदार फुटीनंतर शिंदे गटात दाखल झाले आहेत.माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहर भोईर (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीच उरण येथील जाहीर सभेतून त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.विधानसभेच्या २०१९ साली झालेल्या निवडणूकीत उरण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार महेश बालदी (७४५४९ मते) यांच्याकडून मनोहर भोईर (६८८३९ मते) यांना ५७१० मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.

पराभवाची मिमांसा करताना आमदारांकडे विविध कामांसाठी कर्जत-खालापुर पासून सकाळपासूनच येणाऱ्या गरीब,गरजुंना तासनतास ताटकळत वाट पाहत उभे ठेवणे, जुन्या जाणकार, निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे, फाजील आत्मविश्वास नडल्यानेच मनोहर भोईर यांना पराभव पत्करावा लागला असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.महाविकास आघाडीतुन सर्वात आधी उरण विधानसभेसाठी पुन्हा एकदा मनोहर भोईर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र शेकापकडूनच दबक्या आवाजात उमेदवारीला विरोधाला सुरुवात झाली आहे.माजी आमदार विवेक पाटील कर्नाळा बॅक घोटाळा प्रकरणी गजाआड सरकारी पाहूणचार घेत आहेत.त्यामुळे काही शेकाप समर्थक पदाधिकारी पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भक्कम नेतृत्वाअभावी उरण तालुक्यातील शेकाप कणाहीन, नेतृत्वहीन, दिशाहीन झाली असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातुन इंडिया आघाडीचे  गटाचे संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.सेना-भाजप युतीचे दोन वेळा निवडून येऊन शिंदे गटात सामील झालेले श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत.मात्र मावळ लोकसभेच्या जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीतील काही इच्छुक उमेदवारनिवडणुक लढविण्यासाठी सज्ज आहेत.मात्र मावळमधुन इंडिया महाआघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाली असली तरी अद्यापही महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही.तरीही श्रीरंग बारणे यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्यावर टीका करुन मीच महायुतीचा उमेदवार असल्याचा दावा केला आहे.शिंदे गटही बारणेंच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे.मात्र क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकारणातील घडामोडीत केव्हा काय घडेल याची शाश्वती नाही.त्यामुळे तुर्तास तरी मावळमध्ये इंडिया आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच खरी लढत होण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: in maval lok sabha constituency the real fight is between india aghadi and grand alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.