कर्जत तालुक्यात अवैध उत्खनन सुरूच
By Admin | Updated: May 9, 2017 01:30 IST2017-05-09T01:30:10+5:302017-05-09T01:30:10+5:30
कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा माती उत्खनन सुरू आहे. महसूल अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भर दिवसा जेसीबी

कर्जत तालुक्यात अवैध उत्खनन सुरूच
कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा माती उत्खनन सुरू आहे. महसूल अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भर दिवसा जेसीबी, डंपरच्या साहाय्याने जमीन व टेकड्या फोडून बिनधास्तपणे मातीची चोरी होत आहे. उन्हामुळे परिसरातील नद्या, तलाव आटले आहेत, त्यामुळे नद्यांमधूनही रेती उत्खनन सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून महिनोन्महिने सुरू असलेल्या या उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत आहे.
कर्जत तालुक्यासह नेरळ व परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून जमीन सपाट करण्याचीही कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे जमिनीमध्ये जेसीबी फिरवताना रॉयल्टी भरून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र परवानगी घेऊन सुरू असलेली कामे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना अधिकारी तसेच गावपातळीवर काम करणारे तलाठी यांच्याकडून अवैध माती उत्खननाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यात महसूल खात्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना अवैध उत्खननावर मोहीम राबविण्याचे अधिकार नाहीत का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र महसूल खात्याकडून बेकायदा माती आणि रेती उत्खनन करताना कारवाई केली जात आहे. पण कर्जत तालुक्यात मात्र कारवाई होताना दिसत नाही. यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येत आहे. जमीन सपाटीकरणासाठी माती उत्खननातून रॉयल्टी मिळत असली तरी त्यातून होणारी पर्यावरणाची हानी धोक्याची आणि तोट्याची आहे. महसुलासाठी निसर्ग नष्ट करण्याच्या या प्रकारामुळे भविष्यात मोठे संकट उभे करण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.