उंच लाटांच्या बोटींना धडका; चुके काळजाचा ठोका; खलाशांनी कथन केला सात दिवसांचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:57 IST2025-11-02T10:57:02+5:302025-11-02T10:57:34+5:30
मोंथा वादळात भरकटलेल्या बोटींनी सुरक्षित ठिकाण मिळेल तिथे आसरा घेतला

उंच लाटांच्या बोटींना धडका; चुके काळजाचा ठोका; खलाशांनी कथन केला सात दिवसांचा थरार
मधुकर ठाकूर, लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: मोंथा वादळात भरकटलेल्या बोटींनी सुरक्षित ठिकाण मिळेल तिथे आसरा घेतला. वादळी वाऱ्यांमुळे उंचच उंच लाटा येथून बोटींना धडकत होत्या. त्यामुळे काळजाचा ठोका चुकत होता. पण, दोन्ही बोटी एकमेकांच्या बाजूलाच नांगरून ठेवल्यामुळे आणि बोटींवरील खलाशांनी एकमेकांना धीर दिल्यामुळे लाटांची भीती वाटली नाही. वादळी वाऱ्यातही कसाबसा स्टोव्ह पेटवून जेवण केले आणि मदतीची वाट पाहत राहिलो. अशा शब्दांत श्री गावदेवी मरीन आणि चंद्राई या बोटींवरील खलाशांनी सात दिवसांचा थरार कथन केला.
न्हावा-पनवेल येथील सत्यवान पाटील श्री गावदेवी मरीन व सचिन पाटील यांच्या चंद्राई या दोन्ही बोटींचे चिंतातुर मालक व खलाशांचे कुटुंबीय करंजा बंदरातच ठाण मांडून बसले होते. संपर्काच्या प्रतीक्षेत होते. अखेर या दोन्ही बोटींवरील तांडेलशी संपर्क झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
कोणत्याच बोटीवर जीवितहानी नाही
मोंथा वादळात भरकटलेल्या या सातही बोटी खलाशांसह सुखरूप विविध बंदरांत दाखल झाल्या असून जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मुंबई विभागाचे विभागाचे सहायक आयुक्त अविनाश नाखवा यांनी दिली, तर तटरक्षक दलाच्या शोध मोहिमेत मुंबई उपनगर, पालघर, ठाणे जिल्ह्यातील १५ बोटी आढळून आल्या होत्या.
धनलक्ष्मी, कृष्णप्रसाद, वैष्णोदेवी, भुवनेश्वरी, कन्याकुमारी, महालक्ष्मी, ओम साईराम, पार्वती मैया, धनलक्ष्मी, विजयालक्ष्मी, कृष्णप्रसाद, गंगाप्रसाद, चांदणी, नवीन चांदणी, आई तुळजाभवानी, आदी १५ मच्छीमार बोटी आणि त्यावरील खलाशीही सुरक्षित आहेत. बहुतांश बोटींनी किनारा गाठला आहे.
काही बोटी मासेमारी करत माघारी परतण्यास सुरुवात
साईराम, हरिराम कृपा, सत्यसाई या तीनही बोटी खलाशांसह सुरक्षित व सुखरूप आहेत. परतीच्या मार्गावर असलेल्या काही बोटी मासेमारी करीतच माघारी परतत असल्याने बंदरात उशिराने दाखल होणार आहेत, अशी माहिती बोटीचे मालक महेंद्र वैती यांनी दिली.