जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली; २९५ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:53 PM2019-11-17T23:53:35+5:302019-11-17T23:53:49+5:30

डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण; जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांचीही अवस्था सारखीच

Health system in the district collapsed; ... Positions vacant | जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली; २९५ पदे रिक्त

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली; २९५ पदे रिक्त

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच सुदृढ आरोग्य हेदेखील महत्त्वाचे आहे; परंतु रायगड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दाणादाण उडाली आहे. एक जिल्हा सरकारी रुग्णालय, पाच उपजिल्हा रुग्णालय आणि दहा ग्रामीण रुग्णालयामधील एक हजार १८ मंजूर पदांपैकी तब्बल २९५ पदे रिक्त आहेत. एकट्या जिल्हा सरकारी रुग्णालयामधील ४४४ मंजूर पदांपैकी १७४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत असून, सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

दर महिन्याला रिक्त पदांचा अहवाल सरकारला पाठवण्यात येतो. राज्यात सरकार अस्तित्वात असताना याकडे लक्ष दिले गेले नाही, आता राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असल्याने प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. अलिबाग हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, मुख्य डाक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा कोषागार कार्यालय यासह अन्य महत्त्वाची सरकारी, निम सरकारी कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे २७६ खाटांचे जिल्हा सरकारी रुग्णालयही याच ठिकाणी उभारण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या कानाकोपºयातून सर्वसामान्य नागरिक विविध आजारांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये येतात. अलोपॅथी उपचार पद्धतीबरोबरच, आयुष विभागाच्या माध्यमातून उपचार केले जातात. दररोज येथे उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या सुमारे ५०० च्या आसपास आहे. त्यातील गंभीर रुग्णांवर उपचार करणे गरजेचे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले जाते.

या ठिकाणी ४४४ पदे मंजूर करण्यात आली आहेत. पैकी १७४ पदे रिक्त आहेत आणि २६८ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. अपुºया मनुष्यबळामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे.

रुग्णांना वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने काहींना जीवही गमवावा लागला आहे. दोन दिवसांपूर्वी अलिबाग चावडी मोहल्ला येथील अलमीर रोगे या सहा महिन्यांच्या बालकाचा असाच मृत्यू झाला होता.

योग्य आणि वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये अधूनमधून संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. जिल्हा सरकारी रुग्णालय प्रशासनामार्फत आधी तीन महिन्यांतून रिक्त पदाबाबतचा अहवाल पाठवण्यात येत होता. आता मात्र प्रत्येक महिन्याला सरकारला रिक्त पदांबाबत अवगत केले जाते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

सरकार होते तेव्हा त्यांनी लक्ष दिलेले नाही, आता तर राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असल्याने असे धोरणात्मक निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत. सरकारी रुग्णालयामध्ये गरीब गरजू रुग्ण जास्त प्रमाणात येतात. त्यांच्या व्यथांकडे कोणालाच पाहायला वेळ नाही. त्यामुळे लवकरच जन चळवळीचे आंदोलन उभारून यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आंदोलनाच्या प्रथम टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस जगदीश घरत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जिल्हा सरकारी रुग्णालयाची परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांचीही अवस्था रिक्त पदांमुळे फार वाईट झाली आहे, असे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष मनोज शिर्के यांनी सांगितले. सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी उभारण्यात येणाºया आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना सामावून घेणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उपचाराअभावी बाळाचा मृत्यू
जिल्ह्याच्या ठिकाणी असणाºया रुग्णालयाची अवस्था फार बिकट आहे. अपघात विभागातील डॉक्टरलाच अतिदक्षता विभाग सांभाळावा लागत आहे. कमी डॉक्टरांच्या संख्येमुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. यामध्ये तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे, असे अ‍ॅड. रत्नाकर पाटील यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी वेळेवर उपचार न मिळाल्याने सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रिक्त पदाबाबत उपसंचालक स्तरावर दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येते आणि हा अहवाल उपसंचालकांमार्फत सरकारला सादर केला जातो. आता वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणे अपेक्षित आहे.
- परशुराम धामोडा, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा सरकारी रुग्णालय

रुग्णालयाचे नाव                         मंजूर पदे    भरलेली पदे    रिक्त पदे     कार्यरत पदे
जिल्हा सरकारी रुग्णालय               ४४४             २७०            १७४              २६८
माणगाव उपजिल्हा रुग्णालय          ९६                ७४              २२                 ७१
पेण उपजिल्हा रुग्णालय                  ४९                ४४              ०५                 ४१
कर्जत उपजिल्हा रुग्णालय              ४७                ४४              ०३                 ४४
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय            ४७                ३३              १४                  ३३
रोहे उपजिल्हा रुग्णालय                  ४९                ३४              १५                  ३२
उरण ग्रामिण रुग्णालय                    २८                २३              ०५                  २३
पनवेल ग्रामीण रुग्णालय                  ३८                २९              ०९                  २९
चौक ग्रामीण रुग्णालय                     २७               २३               ०४                  २३
कशेळे ग्रामिण रुग्णालय                  २७               २५               ०२                  २५
मुरुड ग्रामीण रुग्णालय                    २६               २१                ०५                  २१
पोलादपूर ग्रामीण रुग्णालय              २६               १९                ०७                  १८
महाड ग्रामीण रुग्णालय                   २७               २३                ०४                  २३
महाड ट्रामा केअर युनिट                 ११                ०५                ०६                  ०४
जसवली ग्रामीण रुग्णालय               २६                १७               ०९                   १७
म्हसळा ग्रामीण रुग्णालय                २५               १४                ११                    १४
एकूण                                           १०१८           ६९८             २९५                 ६८६

Web Title: Health system in the district collapsed; ... Positions vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.